ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी
By मंगेश व्यवहारे | Published: June 6, 2023 01:08 PM2023-06-06T13:08:17+5:302023-06-06T13:09:11+5:30
हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो
नागपूर : रस्ते वाहतूक कायद्यान्वये वाहतूक विभागाने रस्त्यावरील सर्व सोयी-सुविधा पुरविल्या पाहिजेत. विभाग मात्र सर्व सोयीसुविधा पुरविण्यास असमर्थ असताना नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. वाहन चालक लघुशंका करायला गेला तरी वाहनावर ई-चालानद्वारे दंड आकारला जातोय.
बऱ्याचदा शहरात सिग्नलवर वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस गैरहजार असतात, मोक्याच्या ठिकाणी जणू शिकार करण्याच्या इराद्याने उभे राहतात. वाहतूक विभागाने आपली यंत्रणा सुधारावी. त्यानंतरच जनतेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे वाहतूक पोलिस उपायुक्त व नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सेनेचे प्रभुदास डोंगरे, सचिन धोटे, मंगेश शिंदे, अरुण सेलीवार, प्रशांत निकम, विजय कामटे, रितेश हेमके, नीलेश यादव आदी उपस्थित होते.