सत्तेचा अहंकार बाळगू नका, भाजपचे कॉंग्रेसीकरण करू नका; फडणवीसांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 10:34 PM2023-02-17T22:34:46+5:302023-02-17T22:36:54+5:30
Nagpur News आगामी मनपा निवडणूकांच्या तयारीत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
नागपूर : आगामी मनपा निवडणूकांच्या तयारीत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कानउघाडणी केली. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. मात्र सत्तेचा अहंकार बाळगला तर जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपमध्ये कॉंग्रेसीकरण होऊ देऊ नका,असे परखड बोल फडणवीस यांनी सुनावले. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे काही भाजप नेत्यांची वर्तणूक आहे. मात्र पक्ष आहे म्हणून सत्ता असते. पक्षाचा कार्यकर्ता हा जमिनीवर काम करणारा असावा. जनतेचे पदाधिकाऱ्यांकडे बारीक लक्ष असते. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून नेत्यांनीदेखील कार्यकर्ते म्हणून जनतेची काम करायला हवी व त्यांना मान द्यायला हवा. पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळागाळात जाऊन काम करायला हवे, असे फडणवीस म्हणाले. सध्या पोटनिवडणुका आणि सोबतच राज्याचा अर्थसंकल्पाचे काम असल्यामुळे नागपूरला जास्त वेळ देऊ शकणार नाही. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नागपुरात जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल, असे फडणवीस म्हणाले.
मनपाच्या निवडणूकीत भाजपने १२० जागांचे तर विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १५० जागांवर विजय मिळविण्याचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. त्यादृष्टीने नियोजन करून जनतेला जोडण्यावर भर देण्याची त्यांनी सूचना केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.कृष्णा खोपडे, आ.मोहन मते यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.