रोजगार चालण्यासाठी पर्यावरणीय मापदंडाकडे दुर्लक्ष नको - श्रीकांत टेकाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:06 AM2020-12-07T04:06:42+5:302020-12-07T04:06:42+5:30
नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे निसर्ग आणि मानवतेच्या अस्तित्वाला नवा दृष्टिकोन मिळाला आहे. असे असले तरी रोजगाराच्या ...
नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे निसर्ग आणि मानवतेच्या अस्तित्वाला नवा दृष्टिकोन मिळाला आहे. असे असले तरी रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी पर्यावरणीय मापदंड कमी होण्याची शक्यता आहे, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ श्रीकांत टेकाडे यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात टेकाडे यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होते. दरवर्षी एक वृक्ष सुमारे १५५ किलो प्राणवायू निर्माण करतो. एक एकर जंगलातून सुमारे २.४ टन कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करावा लागेल.
विकासासाठी औद्योगिकीकरण आणि रोजगार हे महत्त्वाचे आहेतच परंतु शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन, कचरा व्यवस्थापन, वनोद्याने, वनीकरण इत्यादीसारख्या वन आणि पर्यावरणीय प्रकल्पातून रोजगाराचे नवे मार्ग निर्माण केले जावे, असा पर्याय त्यांनी सुचविला आहे.
कोरोनाच्या काळामध्ये औद्योगिक आणि वाहतूक कार्यास विराम दिल्यामुळे हवेच्या गुणवत्तेच्या मापदंडात लक्षणीय सुधारणा दिसून आली. व्यवसायाच्या सुलभतेसाठी पर्यावरणाचे निकष सौम्य करण्याऐवजी जमिनीचा वापर, वन्यजीव, प्रदूषण इत्यादी संदर्भातील नियम मजबूत केले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.