अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 11:24 AM2022-03-04T11:24:27+5:302022-03-04T11:27:15+5:30

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

Don't imitate other countries to improve economy said Sarsanghchalak mohan bhagwat | अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

googlenewsNext
ठळक मुद्देजगाला समजेल त्याच भाषेत आपले महत्व समजवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील आर्थिक उतारचढाव फारसे परिणाम करू शकत नाही, असे आपले अर्थकारण राहिले आहे. सहकार व लहान उद्योगांमुळेच हे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल करून काहीही फायदा होणार नाही. कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

एकेकाळी ‘इम्पोर्टेड’ वस्तूंचे महत्त्व होते. आता निर्यातीचे महत्त्व वाढले आहे. देशाचे आर्थिक बळ निर्माण झाले पाहिजे. हे समाजातील उद्योजकतेतूनच शक्य आहे. भारताला जगाला आपले ‘मार्केट’ बनवायचे नाही, तर एक कुटुंब बनवायचे आहे. तरीदेखील आपल्या उत्पादनांचे महत्त्व जगाला जी भाषा समजेल त्याच भाषेत समजवावे लागेल. गुणवत्तेसोबतच मार्केटिंगलादेखील महत्त्व आले असून, चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्ड बनायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले.

छोट्या उद्योगांना बळकटी मिळावी

सहकारितेच्या मागे गुणवत्ता आवश्यक असते. त्यात स्वार्थाला जागा नसते. मात्र सहकारात स्वार्थ आला तर त्याचा स्वाहाकार होतो. सद्य:स्थितीत देशातील छोटे उद्योग व कारागीर यांना बळकटी मिळाली पाहिजे. सहकाराचे काम व्यवसाय करणे नव्हे तर देशाची उभारणी करण्याचे आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात मूठभर लोकांचेच खिसे भरत नाहीत

जगातील देश व्यापाराला नफ्याचे साधन मानतात. परदेशातील व्यापार, उद्योगात काही लोक कंपन्यांचे मालक असतात आणि इतर लोक त्या कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्या व्यवसायातून होणारा लाभ मूठभर लोकांच्या खिशात जातो. परंतु, भारतात असे अजिबात नाही. या भावनांमुळे येथे व्यापारधर्म हा शब्द रूढ झाला आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

Web Title: Don't imitate other countries to improve economy said Sarsanghchalak mohan bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.