आम्हाला चोर ठरवू नका? : रेशन दुकानदारांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:50 AM2020-04-15T00:50:06+5:302020-04-15T00:50:51+5:30

१९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे.

Don't judge us as a thief? : Feelings of ration shopkeepers | आम्हाला चोर ठरवू नका? : रेशन दुकानदारांची भावना

आम्हाला चोर ठरवू नका? : रेशन दुकानदारांची भावना

Next
ठळक मुद्देजीव धोक्यात घालून देतोय सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे. आमच्यावर अविश्वास दाखविला जात आहे. आमच्यासाठी सरकारने आखून दिलेले काही नियम आहेत. या नियमांच्या चौकटीतच आम्हाला काम करायचे आहे. त्यामुळे आम्हाला चोर ठरवू नका, अशी भावना रेशन दुकानदारांची आहे. सध्या रेशन दुकानांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. याचे नेमके काय कारण आहे, याबाबत विदर्भ रास्तभाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याशी केलेली चर्चा.

रेशन कुणाला मिळते?
नागपूर जिल्ह्यात १२८७ रेशन दुकानदार आहेत. तीन प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जाते. यात अंत्योदय कार्डधारकास ३५ किलो धान्य महिन्याला दिले जाते. बीपीएल कार्डधारकाला प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. तर केशरी रंगाच्या सर्वच कार्डधारकांना रेशन मिळत नाही, त्यात प्राधान्य गटालाच प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य महिन्याला दिले जाते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना काय आहे?
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. अशात गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. यात प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. परंतु ही योजना फक्त अंत्योदय, बीपीएल व केशरी (प्राधान्यगट) या कार्डधारकांसाठी आहे. या योजनेचा लाभ सध्यातरी कार्डधारकांनाच मिळतो आहे.

निकृष्ट धान्य का मिळतेय?
सध्या गव्हाचा जो पुरवठा झाला आहे तो २ ते ३ वर्षे जुना स्टॉक आहे. त्यामुळे गव्हाचा दर्जा थोडा सुमार आहे. रेशन दुकानदार स्वत:हुन निकृष्ट धान्य देत नाही.

किटमुळे का होतोय वाद?
पालकमंत्र्यांनी अंत्योदय कार्डधारकांसाठी १८ वस्तूंची किट रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटप केली होती. ही किट फक्त अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांसाठी होती. पण बीपीएल व प्राधान्य गटाच्या कार्डधारकांनीसुद्धा त्याची मागणी केली. तेथूनच रेशन दुकानात वादाला सुरुवात झाली.

अचानक रेशन दुकानात गर्दी का वाढली?
ज्यांच्याजवळ रेशनकार्ड आहे असे २५ टक्के लोक दुकानातून धान्य घेत नव्हते. असेही लोक आता धान्यासाठी येत आहेत. ज्यांच्याजवळ कार्ड आहे परंतु तो एपीएल गटात येत असल्याने त्यांना धान्य मिळत नाही, तेसुद्धा धान्य मागण्यासाठी येत आहे. काही लोक आधार कार्ड घेऊन धान्य मागत आहे. तर काही लोकांच्या कार्डची डाटा एन्ट्री झाली नाही, तेसुद्धा कार्ड घेऊन धान्य मागत आहे. त्यामुळे रेशन दुकानात गर्दी वाढली आहे.

काळाबाजाराचा का होतो आरोप?
रेशन दुकानदाराकडे कार्डाच्या हिशेबाने रेशनचा कोटो येतो. अतिरिक्त कोटा मिळत नाही. परंतु काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमच्याकडे १ क्विंटल धान्याची मागणी करतात. आम्ही त्यांना पुरवू शकत नाही. म्हणून खोट्या तक्रारी करतात. कुठे मारहाणसुद्धा रेशन दुकानदारांना होत आहे. पोलिसातदेखील तक्रारी झाल्या आहे. प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत ८० टक्के पुरवठा झाला आहे. अजूनही २० टक्के व्हायचा आहे. जिथे धान्य पोहचले तिथे धान्याचे वाटप सुरू आहे. जिथे पोहचले नाही, तिथे धान्य आल्यास लगेच पुरवठा होणार आहे.

शासनाकडून त्रास नाही?
अन्न व पुरवठा विभाग अतिशय चोख काम करीत आहे. शासनाने आता ज्यांच्याजवळ कार्ड नाही, अशांचे आधार कार्ड व ज्यांच्याजवळ कार्ड आहे पण डाटा इंट्री झाली नाही, अशांचे कार्ड जमा करण्यास सांगितले आहे. एपीएल कार्ड धारकांनाही शासन १२ रुपये किलो तांदूळ व ८ रुपये किलो गहू उपलब्ध करून देणार आहे.

सरकारी कर्मचारी दुकानात बसविले, काय कारण आहे?
कदाचित सरकारचा आमच्यावर विश्वास नाही. पण आम्ही जीव धोक्यात घालून काम करतो आहे. आम्हालाही माणुसकी आहे. अशा परिस्थितीत आम्हीच काळाबाजार करणार नाही. तरीही सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दुकानात बसविले, आम्हाला हरकत नाही. जे काळाबाजार करतात त्यांच्या तक्रारी करू शकता. पण बळजबरी आमच्यावर करू नका. दुकानाच्या वेळेसंदर्भात अडवणूक करू नका. कारण आम्हालाही आलेले धान्य वाटप करायचे आहे.

रेशन दुकानावर तैनात एनसीसी कॅडेट्स
कोरोना विषाणूच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत आता नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)नेसुद्धा योगदान दिले आहे. एनसीसीच्या महासंचालकांनी ‘एनसीसी योगदान’ ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत एनसीसीची प्रशिक्षित मुले-मुली व्हॉलेन्टीअर म्हणून कोरोनाच्या लढाईत सहभागी होत आहेत. जिल्हा प्रशासनालासुद्धा एनसीसीने सहकार्य केले आहे. सध्या रेशन दुकानात होत असलेली गर्दी लक्षात घेता, कार्डधारकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एनसीसीच्या कॅडेट्सची मदत घेतली आहे. एनसीसीचे ३५० कॅडेट्स व १६ अधिकारी शहरातील ९६ रेशन दुकानात तैनात झाले आहे.

Web Title: Don't judge us as a thief? : Feelings of ration shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.