रेडा बोलला की माहित नाही, मात्र तुम्ही-आम्ही बोलते झालो : प्रमोद जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:25 AM2019-12-10T00:25:57+5:302019-12-10T00:28:15+5:30
ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे. ज्ञानदेवांसारख्या महापुरुषाने डोक्यावर हात ठेवून शक्तीपात केल्यानंतर तो रेडा न बोलता, तेच नवल. या चमत्कारानंतर तो रेडा आळंदीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे चालत आला, हेदेखील समजून घ्यावे लागेल. सात शतकांपूर्वी संतांच्या मार्गदर्शनात चालावे, हे त्या रेड्याला कळले पण, आपल्याला आजही ते उमगले नाही, अशा शब्दांत बारामतीचे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांनी ‘संतांचा सुखाचा मार्ग’ या विषयावर पुष्प गुंफले.
श्री विष्णुदासजी महाराज अध्यात्म साधना केंद्र, नागपूरच्या वतीने आयोजित श्री दत्तजयंत्युत्सव सोहळ्यातील प्रवचन मालेत, दादामहाराज सातारकर यांचा पुण्यस्मरणदिन आणि गीताजयंतीचे औचित्य साधून त्यांनी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
संसारामध्ये कधीही सुखाचा शोध घेऊ नका. ते कदापिही सापडणार नाही. ज्याप्रमाणे नागपूरची गाडी पुण्याला पोहचणार नाही त्याप्रमाणे संसाराच्या गाडीत सुखाचे स्टेशन कधीच येणार नाही. त्यासाठी, गाडी बदलावी लागेल आणि अध्यात्माच्या गाडीत बसावे लागेल तरच सुखाचे स्टेशन मिळू शकेल, असे सूचक विवेचन जगताप महाराजांनी केले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात केंद्र प्रमुख कल्याण पुराणिक यांनी श्रीगुरूचरित्राचे वाचन केले. तर, सायंकाळच्या सत्रात पुण्याच्या अवंतिका टोळे यांचे कीर्तन रंगले.