नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:44 PM2020-07-31T21:44:40+5:302020-07-31T21:47:09+5:30
‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू, असा इशाराच महापौर संदीप जोशी यांनी दुसऱ्या बैठकीत दिला. एकूणच आता ‘लॉकडाऊन’च्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
‘लॉकडाऊन’संदर्भात मनपाच्या सभागृहात दुपारी १२ वाजता पूर्वनियोजित बैठक होती व यात पुढील रूपरेषेवर चर्चा होणार होती. नेमकी याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर यावेळी उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यूसंख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. साथीच्या काळात स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीमार्फ त मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ आहे. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून प्रशासन मृत्यूसंख्या कमी करणे व जनजागृती या विषयी काम करणार आहे. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, हा आग्रह कायम राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी आक्रमक
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ‘लॉकडाऊन’चा विरोधच करण्यात आला. ‘स्मार्ट लॉकडाऊन’चीदेखील आवश्यकता नसल्याचा बैठकीत सूर होता. पुढील बैठक ७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला खा. विकास महात्मे, शहरातील भाजपचे सर्व आमदार, मनपा पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रत्येक रुग्णाची ‘अॅण्टिजेन टेस्ट’
वैद्यकीय उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ‘अॅण्टिजेन टेस्ट’ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
पालकमंत्र्यांवर महापौरांचे टीकास्त्र
मनपाची शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे यासंदर्भात पालकमंत्र्यांना माहिती होती. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्याची गरज नव्हती. आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही बैठक थोडी उशिरा घेतली असती. एकाच वेळी दोन बैठका झाल्यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. ‘कोरोना’च्या या काळात असे राजकारण करणे योग्य नाही, या शब्दांत महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मुंढे गैरहजर
मनपातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे पोहोचलेच नाहीत. ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही कळविले नाही. जर त्यांनी सांगितले असते तर बैठकीची वेळ बदलता आली असती. मात्र त्यांनी मनपाच्या बैठकीला पाठ दाखविणे योग्य नाही, असे म्हणत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
सम-विषमचा नियम नको
जेथे १२ मीटरहून अधिक रुंदीचा रस्ता आहे तेथे सम-विषमचा नियम न लावता दोन्ही बाजूंची दुकाने उघडायला परवानगी दिली पाहिजे. शहरात दुकानदारांकडून अवैध पद्धतीने दंड वसुलण्यात येत आहे. याची स्थायी समितीकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. मनपा प्रशासन व काही हॉटेल संचालकांचे साटेलोटे आहे. १४ दिवस ‘क्वॉरंटाईन’ ठेवून बिल वाढविण्यात येत असल्याचा आरोप महापौरांनी लावला.