आपले शहर विद्रुप करू नका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:57+5:302021-06-19T04:06:57+5:30
नागपूर : चांगल्या कलाकृतींना विद्रुप करणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही. अशा विकृत मानसिकतेमुळे चांगल्या कलाकृतीचे सौंदर्य नष्ट होते. ...
नागपूर : चांगल्या कलाकृतींना विद्रुप करणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही. अशा विकृत मानसिकतेमुळे चांगल्या कलाकृतीचे सौंदर्य नष्ट होते. आपण जसे घराचे सौंदर्य जपतो, त्याचप्रमाणे शहरही आपले घर आहे आणि त्याची अस्मिता जपण्याचे आपले कर्तव्य आहे, अशी मानसिकता नागपूरकरांनी जोपासावी. कारण ही प्रॉपर्टी जनतेची आहे आणि त्याचे संरक्षण करणेही जनतेचेच कर्तव्य असल्याची भावना केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
लिबर्टी उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण गडकरी यांच्याहस्ते झाले. सदरच्या अंजूमन कॉलेजमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, माजी आमदार सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. लिबर्टी फ्लायओव्हरचे ४.५५ किलोमीटरचे सौंदर्यीकरणाचे काम शहरातील हस्तांकित या संस्थेच्या कलावंतांकडून करण्यात आले. यासाठी ३.९० कोटी रुपयांचा खर्च झाला. कोविडच्या काळात जेव्हा कलावंतांकडे काम नव्हते, तेव्हा या प्रकल्पामुळे त्यांच्या हाताला काम मिळाले. या कलावंतांनी अतिशय अप्रतिम सौंदर्यीकरण केल्याचे गडकरी म्हणाले. हस्तांकित या संस्थेच्या कलावंताचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केदारांकडून गडकरींचे कौतुक
- प्रसंगी सुनील केदार यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक करीत म्हणाले की विकासाच्या कामांमध्ये गडकरींनी कुठलेही किंतू परंतु न ठेवता, राजकारण न करता काम केले आहे. राजकारण करीत असताना समाजकारणासाठी राजकारण बाजूला ठेवण्याची प्रेरणा गडकरीकडून मिळत असल्याचे केदार म्हणाले.