रेती चोरी करण्यासाठी जीपीएस नको का? पालकमंत्री फडणवीस यांचा सवाल; घरकुलांना रेती देण्याची सूचना

By कमलेश वानखेडे | Published: January 1, 2024 06:28 PM2024-01-01T18:28:40+5:302024-01-01T18:29:06+5:30

जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले सावनेरचे माजी आमदार यांच्या समर्थनार्थ लागलेल्या अवैध होर्डिंगचा मुद्दा गाजला.

Don't need GPS to steal sand Guardian Minister Fadnavis question Instructions for sanding the cages | रेती चोरी करण्यासाठी जीपीएस नको का? पालकमंत्री फडणवीस यांचा सवाल; घरकुलांना रेती देण्याची सूचना

रेती चोरी करण्यासाठी जीपीएस नको का? पालकमंत्री फडणवीस यांचा सवाल; घरकुलांना रेती देण्याची सूचना

नागपूर : शहर व जिल्ह्यात घरकुलांना रेती मिळत नाही. रेती पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टरवर जीपीएस लावण्याची अट असल्यामुळे अडचणी येत आहेत, असा मुद्दा आ. आशीष जयस्वाल यांनी डीपीसीच्या बैठकीत मांडला. यावर जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांनी वाहनांवर जीपीएस बंधनकारक असल्याचे शासकीय आदेशात नमूद असल्याचे सांगितले. याची दखल घेत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोरी करण्यासाठी जीपीएस नको का, असा सवाल करीत जीपीएस लागलाच पाहिजे, असे स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी जिल्ह्यातील रेती डेपो बंद असल्यामुळे घरकुलांच्या बांधकामासाठी रेती मिळत नसल्याचे सांगितले. आ. प्रवीण दटके यांनी हाच धागा धरत रेती पुरवठ्यात घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला. सरकार एक ब्रास रेती ६०० रुपयांत देते पण ट्रान्सपोर्टर ४ ब्रास रेतीसाठी तब्बल १५ ते १७ हजार रुपये घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आ. आशीष जयस्वाल यांनीही हा मुद्दा लावून धरला. याची दखल घेत पालकमंत्री फडणवीस यांनी घरकुलांना रेती मिळेल याची जबाबदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली.

केदारांचे अवैध होर्डींग्ज हटवा
जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले सावनेरचे माजी आमदार यांच्या समर्थनार्थ लागलेल्या अवैध होर्डिंगचा मुद्दा गाजला. आ. टेकचंद सावरकर यांनी आपल्या मतदारसंघात शिक्षा झालेल्या आरोपीचे अवैध होर्डिंग लागले असल्याचे सांगत या माध्यमातून जणू सरकारनेच शिक्षा केली असे दाखविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षक यांनी दखल घेण्याची मागणी त्यांनी केली. आ. विकास ठाकरे यांनी संबंधित होर्डींग हे शिक्षा होण्यापूर्वीचे आहेत, असा युक्तीवाद केला. यावर पालकमंत्री फडणवीस यांनी हा या समितीचा विषय नसल्याचे सांगत कुठेही, कोणतेही अवैध होर्डींग लागले असतील, तर ते काढावे, असे निर्देश दिले.

रामदासपेठचा पूल ३१ जानेवारीपूर्वी सुरू होणार
रामदासपेठ येथे नागनदीवरील पूल अतिवृष्टीमुळे तुटला. २ वर्षे होऊनही या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. यामुळे ट्राफिक जाम होऊन नागपूरकरांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे आ. विकास ठाकरे यांनी लक्ष वेधले. हा पूल नेमका कधी सुरू होणार, अशी विचारणा त्यांनी केली. यावर महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२ मध्ये या कामासाठी कार्यादेश देण्यात आले होते व एक वर्षांची मुदत होती. ती मुदत ऑक्टोबर २०२३ मध्ये संपली. मात्र कामात काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे कंत्राटदाराला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. तोवर पूल सुरू झाला नाही, तर दंड आकारू, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावर पालकमंत्री फडणवीस यांनी हा पूल तुटल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत असल्याचे सांगत त्वरित बांधकाम पूर्ण करण्याची सूचना केली.

Web Title: Don't need GPS to steal sand Guardian Minister Fadnavis question Instructions for sanding the cages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.