लॉकडाऊन कठोर नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:23+5:302021-05-15T04:07:23+5:30
नागपूर : राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लावले आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत. सव्वा ...
नागपूर : राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लावले आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत. सव्वा महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. कठोर नियमांतर्गत वेळेचे बंधन ठेवून दुकाने सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. कोरोनाशी लढताना व्यवसाय वाचविणेही आवश्यक आहे. या संदर्भात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. सर्वच वर्गवारीतील दुकाने नियमित सुरू करा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
व्यवसाय बंद असल्यानंतरही व्यापारी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देत आहेत. वीजबिल, बँकेचे व्याज, मासिक हप्त्याचा नियमित भरणा करीत आहेत. गेल्या वर्षीही ५ महिने व्यवसाय बंद होता. सध्या व्यापाऱ्यांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासोबतच व्यवसाय वाचविणे गरजेचे आहे. व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट आले आहे.
चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. नागपूरचा संपूर्ण व्यवसाय ६ एप्रिलपासून बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. दिवसरात्र व्यस्त राहणारे व्यापारी सव्वा महिन्यापासून कामाविना बसले आहेत. त्यामुळे दुकाने सुरू करणे आवश्यक आहे.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, सर्वच दुकाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. मुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. दुकाने सुरू केल्यास व्यवसायाला चालना मिळणार आहे. बंद दुकाने सुरू करून ग्राहक येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. त्यानंतरच आर्थिक नुकसान भरून निघेल.
नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, किराणा दुकानदारांची वेळ सकाळी ११ पर्यंत असल्याने व्यापाऱ्याला व्यवसायाला वेळ मिळत नाही. शिवाय ठोक बाजारातून व्यापाऱ्यांची खरेदी होत नाही. त्यामुळे अनेक वस्तूंचा तुटवडा होत आहे. चिल्लर किराणा दुकाने सकाळी आणि सायंकाळी दोन वेळात सुरू ठेवल्यास व्यापारी व ग्राहकांच्या सोयीचे होईल.
नागपूर इतवारी ठोक किराणा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने ग्राहकांची गर्दी होते. याशिवाय फोनवर ऑर्डर घेऊन पुरवठा करणे शक्य नसते. त्यामुळे इतवारीतील दुकाने सकाळी ७ ते ११ ऐवजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवावीत. हे सर्वांच्या फायद्याचे राहील.