गर्दी करू नका, दुकाने वेळेत बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:34+5:302021-05-18T04:09:34+5:30
भिवापूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ओसरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातही बाधितांचा टक्का घसरतोय. अशात नागरिकांनी पुन्हा गर्दी करत समूहाने ...
भिवापूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ओसरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातही बाधितांचा टक्का घसरतोय. अशात नागरिकांनी पुन्हा गर्दी करत समूहाने एकत्र आल्यास संसर्ग वाढण्याची भीती आहे. याची दखल घेत पोलिसांनी सोमवारी भिवापूर शहरात पैदल मार्च केला. गर्दी करू नका, दुकाने वेळेत बंद करा, असे आवाहन पोलिसांनी केले.
तालुक्यात सध्या कोविड सेंटर व गृहविलगीकरणात केवळ ३१८ रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज १० ते १२ नवीन रुग्णांची नोंद होत असून, यापेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. परिस्थिती अशीच नियंत्रणात राहिल्यास आठवडाभरात तालुका कोरोनामुक्त होईल. मात्र रुग्णांची संख्या उतरतीवर असताना आता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे गर्दीतून पुन्हा संक्रमण वाढू नये यासाठी ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण पोलीस कर्मचारी सोमवारी रस्त्यावर उतरले. नाकाबंदी करत, वाहनांची तपासणी आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर शहरात पोलिसांनी गस्त घातली. चौकात विनाकारण गोष्टीत गर्क असणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, कृषी केंद्र चालकांनी दुकाने वेळेत बंद करावी. दुकानात गर्दी होऊ देऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले. यावेळी ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह सहायक निरीक्षक शरद भस्मे, उपनिरीक्षक प्रकाश चंगोले व कर्मचारी उपस्थित होते.