या ‘गुरू’ला बगलेत मारून घेऊन जाऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:08+5:302021-07-20T04:07:08+5:30

‘वाचाल तर वाचाल’, ‘ग्रंथ हेच गुरू’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, असे सुविचार, सुभाषिते अमलात आणायचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यासाठी ...

Don't take this 'Guru' by the arm! | या ‘गुरू’ला बगलेत मारून घेऊन जाऊ नका!

या ‘गुरू’ला बगलेत मारून घेऊन जाऊ नका!

Next

‘वाचाल तर वाचाल’, ‘ग्रंथ हेच गुरू’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, असे सुविचार, सुभाषिते अमलात आणायचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करतात. अनेकांना पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय नसते. त्यावर ग्रंथालय नावाचा उपाय हाताशी असतोच. त्याशिवाय, ज्यांना महिन्यात विशिष्ट रक्कम पुस्तकांच्या खरेदीवर खर्च करायची दुर्मीळ सवय असते, त्यांच्याशी वाचनप्रेमापोटी अनेक जण दोस्ती वाढवितात. बरेच जण वाचायला नेलेले पुस्तक परत देण्याचे नाव काढत नाहीत. ग्रंथालयांनाही अशा परत न मिळालेल्या पुस्तकांचा प्रश्न भेडसावतो. ग्रंथपालनाचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाही पुस्तक परत न करणाऱ्या वाचनप्रेमींवर तोडगा सापडत नाहीत. बहुतेक वेळा तशी पुस्तके बुडीतखाती नोंद करावी लागतात. पुस्तकचोरी हा असा अनेक अंगांनी आपल्या वाचनविश्वाचा विषय आहे; पण पुण्याच्या नगरवाचन मंदिराने यावर नामी उपाय शोधला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी स्थापन केलेले अन् शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारे हे वाचनालय ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ तंत्र वापरून आता नोंद न करता गुपचूप पुस्तक वाचनालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला तर तो पकडण्याची व्यवस्था करीत आहे. हे तंत्रज्ञान तसे नवे नाही. अनेकांनी शाळा-महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्रयोगात ते वापरलेले असते. मागे नोटाबंदी झाल्यानंतर बाजारात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेला नॅनो चिप असल्याची टूम सोडून देण्यात आली होती. जमिनीखाली गाडून ठेवल्या तरी त्या नोटांच्या पुडक्याचा पत्ता सरकारला लागणारच, असा दावा करणारी न्यूज चॅनलची निवेदिका अजूनही त्यासाठी ट्रोल होत राहते. तेव्हा, नॅनो नसेल; पण या आरएफआयडीच्या निमित्ताने पुस्तकात इलेक्ट्रॉनिक चीप आली, हे महत्त्वाचे. तंत्रज्ञानाने वाचन कमी झाले, असे म्हणणाऱ्यांसाठी महत्त्वाचे हे, की तंत्रज्ञानाचा पुस्तकांना फायदाही होतो.

क्षेत्र कोणतेही असो, तंत्रज्ञानाचा वापर आपण थांबवू शकत नाही. ते वापरायचे कसे, हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. पुण्यासारखा इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर आता इतरत्र नक्की होईल. वर्तमानपत्रात क्यूआर कोड, तसे पुस्तकाला, प्रश्नपत्रिकांनाही बारकोड आले. ग्रंथव्यवहारांमध्ये आयएसबीएनप्रणाली सगळीकडे वापरली जाते. वाचन चळवळ बळकट करण्यासाठी अनेक संस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढाकार घेताहेत. गेल्या वर्ष-दोन वर्षांत नवी मुंबईत ‘लेटस् रीड इंडिया’ नावाची चळवळ एका उद्योजकांच्या पुढाकाराने खेड्यापाड्यात पुस्तके पोहोचविते. पुस्तकांच्या परिचयासाठी सोशल मीडिया वापरला जातो. पुस्तके भेट दिली जातात. त्यातून अधिकाधिक लोकांना वाचनासाठी प्रोत्साहित केले जाते. केरळमधल्या एलिक्कुलमची पांबोली नवभारत लायब्ररी हव्या त्या वेळी पुस्तक उपलब्ध करून देते, तर तिरुवअनंतपुरममध्ये ‘अक्षरानीधी’ नावाची खुल्या ग्रंथालयाची चळवळ अगदी सकाळी गरम चहाचे घोट घेत असतानाही आपल्या दारात पुस्तके घेऊन उभी असते. तरीही पुस्तकचोरी होतेच. आपला ग्रंथरूपी गुरू, दोस्त, मार्गदर्शक हळूच बगलेत मारून घेऊन जाणारे सर्वत्र असतातच असतात. ही चोरी अशी की अनेकांची इच्छा असेल की तिला प्रोत्साहन द्यायला हवे; पण ज्याचे पुस्तक चोरी जाते त्यालाच त्या चोरीच्या वेदना ठाऊक. असे एकटेदुकटे पुस्तकच चोरी जाते असे नाही. काही दरोडेही असतात. पाच वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी आयोजकांनी ग्रंथविक्री दालनाची सुरक्षा काढून घेतली अन् साहित्य अकादमीच्या पुस्तकांची नऊ पार्सले चोरीला गेली. तिकडे इंग्लंडमध्ये तर अक्षरश: दरोडा पडला होता. जानेवारी २०१७ मध्ये पश्चिम लंडनच्या फेलथॅम भागात एका गोदामातून २४० दुर्मीळ पुस्तके चोरीला गेली. त्यांची किंमत होती तब्बल २२ कोटी. गॅलिलिओ, न्यूटन हे शास्त्रज्ञ किंवा स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया यासारख्या दिग्गजांची पुस्तके अमेरिकेत बौद्धिक वारसा म्हणून लिलावासाठी नेली जाणार होती. त्यावर दरोडा पडला व साडेतीन वर्षांनंतर तो साठा रोमानियात जमिनीखाली पुरलेला सापडला. अशी दुर्मीळ पुस्तके मुंबई, पुण्यातल्या फुटपाथवर पूर्वी मिळायची. अनेकांसाठी तो उघडा खजिना होता. त्यातूनच अनेकांच्या घरात पुस्तकांचा खजिना उभा राहिला. तो सांभाळायचा कसा, ही काळजी तुम्हाआम्हाला असते, ती पुस्तक चोरी करणाऱ्यांच्या वाचनप्रेमामुळे!

--------------------------------------------------

Web Title: Don't take this 'Guru' by the arm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.