रक्तदानाकडे पाठ फिरवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:43+5:302021-07-15T04:06:43+5:30
नागपूर : अचानकपणे जीवावर संकट येऊन रक्ताची गरज कोणाला, कधी व कुठे पडेल हे सांगता येत नाही. जर तुम्ही ...
नागपूर : अचानकपणे जीवावर संकट येऊन रक्ताची गरज कोणाला, कधी व कुठे पडेल हे सांगता येत नाही. जर तुम्ही आज रक्तदानाकडे पाठ फिरवली तर उद्या तुम्हांलादेखील त्याची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्ण कुठल्याही जाती, धर्म, पंथाचा असला तरी तुम्ही दिलेले रक्त त्याच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट आणू शकते. तुमच्या पुढाकाराने कुठल्या तरी लहानगीला तिची आई परत मिळू शकते व तुम्हांला मोठे पुण्य मिळू शकते हे विसरू नका, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरोग्य संस्था (बाहो) नागपूरच्या अध्यक्षा डॉ. त्रिशला ढेमरे यांनी येथे केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीप्रित्यर्थ ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही राज्यव्यापी रक्तसंकलन मोहीम मोठ्या स्तरावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी ‘बाहो’च्यावतीने मेडिकलच्या रक्तपेढीत आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ‘बाहो’चे सचिव डॉ. निकेतन जांभुळकर, डॉ. सुचित बागडे, मेडिकल रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, डॉ. नितीन शेंडे, डॉ. मुकेश वाघमारे, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. दीपा जहांगिरदार, डॉ. कृष्णकुमार ढेमरे, डॉ. प्रवीण मेश्राम, जामुनकर आदी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. वाघमारे व डॉ. शेंडे यांनी रक्तदान करून केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
-मेडिकलला रोज ५० रक्तपिशव्यांची गरज : डॉ. पराते
डॉ. संजय पराते म्हणाले, मेडिकलला रोज ४० ते ५० रक्तपिशव्यांची गरज पडते. त्या तुलनेत फार कमी रक्तदान होते. सर्वाधिक रक्ताची गरज दुर्गम व गावखेड्यातून येणाऱ्या प्रसूती मातांना पडते. अपघातातील जखमी किंवा अचानक होणाऱ्या गंभीर शस्त्रक्रियेच्यावेळी रक्त जमा करून ठेवावे लागते. रक्ताच्या तुटवड्यामुळे कोणी अडचणीत येऊ नये यासाठी जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान करावे. ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान चळवळीमुळे मोठा फायदा रुग्णांना होत आहे.