मनपाचे तिकीट फायनल समजू नका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:05+5:302021-07-11T04:07:05+5:30
नागपूर : भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयोजित बैठकीत नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. महापालिकेची आगामी निवडणूक ...
नागपूर : भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयोजित बैठकीत नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. महापालिकेची आगामी निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पण नगरसेवकांनी आतापासून एरियाची वाटणी केली आहे. हे योग्य नाही. चारही नगरसेवकांनी आपसात समन्वय साधून संपूर्ण प्रभागात काम करा. कुणाचेही तिकीट फायनल समजू नका. तुमचा परफॉर्मन्स व जनमत विचारात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, अशा शब्दात फडणवीस यांनी नगरसेवकांना झापझुप केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये नगरसेवकांची बैठक घेतली. तीत खा. विकास महात्मे, शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते. भाजपची कोअर टीम नगरसेवकांच्या कामगिरीवर फारशी खूश नाही. याचाच प्रत्यय या बैठकीत आला. फडणवीस म्हणाले, तिकिटांसाठी शिफारशी, वशिला आपल्याकडे चालत नाही. प्रत्येकाच्या कामाचे ऑडिट होईल. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने मागील पाच वर्षात केलेल्या कामाची कार्यपुस्तिका तयार करण्याचे आदेश दिले. प्रभागातील नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढवा. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. जेथे गरज वाटेल तेथे आमदारांसह वरिष्ठ नेत्यांची मदत घ्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
राज्य सरकारचे अपयश मांडा
- राज्यात भाजपचे सरकार असताना नागपूर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. महाविकास आघाडीने नागपूरचा विकास रोखला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. राज्य सरकारचे अपयश दाखविणारे मुद्दे ताकदीने जनतेसमोर मांडा, अशा टीप्सही फडणवीस यांनी नगरसेवकांना दिल्या.