निकालाची प्रतीक्षा नको, सुरू करा पुढले वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:11+5:302021-07-27T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही पूर्णपणे लागलेले नाहीत. विद्यार्थी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही पूर्णपणे लागलेले नाहीत. विद्यार्थी व महाविद्यालये निकालांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, कुठल्याही स्थितीत शैक्षणिक कॅलेंडरप्रमाणे २ ऑगस्ट रोजीच नवीन विषय सत्र सुरू झाले पाहिजे, अशी विद्यापीठाची भूमिका आहे. त्यामुळेच निकाल लागला नसेल तरी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश देऊन ऑनलाइन वर्ग सुरू करा, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
नागपूर विद्यापीठाने २०२१-२२ या शैक्षणिक सत्राचे कॅलेंडर २५ जून रोजी जारी केले. यानुसार पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. परंतु, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. निकालच लागले नसताना वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रम होता. मात्र, नागपूर विद्यापीठाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शैक्षणिक कॅलेंडरचे पालन होणे आवश्यक आहे व त्यामुळे कुठल्याही स्थितीत २ ऑगस्टपासून वर्ग सुरू झाले पाहिजेत. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, संचालित महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रम त्याच दिवशी सुरू करावा. उन्हाळी परीक्षेचे निकाल जाहीर झाले नसतील तर विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा व ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात यावे, असे निर्देश कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी जारी केले आहेत.
अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे सत्र १ सप्टेंबरपासून
२ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना ही अट लावण्यात आलेली नाही. हे अभ्यासक्रम व केंद्रीय पद्धतीने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे सत्र १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.