जेनेरिक नको, ब्रॅण्डेडच औषध हवे; डॉक्टरने नाकारली औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:02 PM2019-08-21T12:02:34+5:302019-08-21T12:03:06+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर रुग्णाला ब्रॅण्डेड ऐवजी जेनेरिक औषधे का विकत घेतली, यावरून वाद घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे उपलब्ध व्हावी, यासाठी ऑक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबवित आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानेही आपल्या सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषधेच लिहून देण्याचा सूचना केल्या आहेत, असे असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर रुग्णाला ब्रॅण्डेड ऐवजी जेनेरिक औषधे का विकत घेतली, यावरून वाद घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने शासकीय रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे.
वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी गरीब रुग्ण शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक औषधे बाहेरून घ्यावी लागतात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या २००२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याच्या सूचना आहेत. मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी या संदर्भात वेळोवेळी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. विभाग प्रमुखांनी आपल्या डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन देताना रुग्णालयात उपलब्ध औषधेच, त्यातही जेनेरिक नावच लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागातील कनिष्ठ डॉक्टर या आदेशाचीच पायमल्ली करीत असल्याचे प्रकरण सामाजिक कार्यकर्ता नीलेश नागोलकर यांनी समोर आणले.
प्राप्त माहितीनुसार, रिताबाई कटारे (६०) रा. चंद्रपूर, या महिलेची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिन्याभरापूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली. गेल्या काही महिन्यापासून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी त्या आपल्या नातेवाईकांसोबत ‘सीव्हीटीएस’ विभागात आल्या असता डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे ‘ब्रॅण्डेड’ औषधे लिहून दिली. परंतु ती औषधे साडेतीन हजार रुपयांची होत असल्याने व एवढे पैसे नसल्याने त्यांनी जेनेरिक औषधालयातून ११७८ रुपयांचे औषधे खरेदी केली. ती त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी ‘ब्रॅण्डेड’ औषधे खरेदी का केली नाही, असा प्रश्न केला. महागडे व स्वस्त साबणाचे उदाहरणही दिले. रुग्णालयाच्या समोर असलेल्या न्यू संजीवनी व अमृत औषधीच्या दुकानात त्या मिळतात असेही सांगून औषधे परत करण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोमवारी रात्री व्हायरल झाला. या व्हिडीओला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी प्रकरण तपासणीचे आदेश दिले. मेडिकल प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जेनेरिक नाकारणे चुकीचेच
मेडिकलमध्ये सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषधेच लिहून देण्याच्या सूचना आहेत. यामुळे रुग्णांनी आणलेली जेनेरिक औषधी नाकारणे चुकीचे आहे. तूर्तास या संदर्भात कुणी तक्रार दाखल केलेली नाही. एका व्हिडीओतून हे प्रकरण समोर आले आहे. यामुळे तपासणीचे आदेश दिले आहे. यात कुणी दोषी आढळून आल्यास नियमानुसार कारवाई होईल.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल