वृद्धाश्रमाची दारे वृद्धांसाठीच बंद
By admin | Published: October 1, 2015 03:06 AM2015-10-01T03:06:31+5:302015-10-01T03:06:31+5:30
आयुष्याची संध्याकाळ सुखमय व्हावी म्हणून मुलांच्या भविष्यासाठी मायबाप आयुष्यभर खस्ता खातात.
मंगेश व्यवहारे नागपूर
आयुष्याची संध्याकाळ सुखमय व्हावी म्हणून मुलांच्या भविष्यासाठी मायबाप आयुष्यभर खस्ता खातात. मुले मोठी झाल्यानंतर हेच मायबाप त्यांना डोईजड वाटतात. यातूनच वृद्धांची वृद्धाश्रमाकडे वाटचाल होत आहे. परंतु वृद्धाश्रमानेही आता वृद्धांसाठी दारे बंद केली आहेत. कारण वृद्धाश्रमांना २००९ पासून सरकारने अनुदानच दिलेले नाही. त्यामुळे संस्थांना वृद्धाश्रम चालविणे कठीण झाल्याने नवीन वृद्धांना प्रवेशच नाकारले आहेत.
वृद्धांचा वृद्धाश्रमाकडे वाढता कल लक्षात घेता, आधुनिकतेकडे वाटचाल करणारा समाज, आपली संस्कृती हरवत चालल्याचे दिसत आहे. ज्येष्ठांना आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरवर्षी ज्येष्ठ नागरिकदिन साजरा करताना संस्था, शासन मोठ्या पोटतिडिकीने त्यांच्यावर बोलतात. प्रत्यक्षात काही करण्याची वेळ येते तेव्हा कुठलीही संस्था, शासन त्यांच्याकडे डोळेझाक करतात. वृद्धांना घरातून हाकलणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना अडगळीत ठेवणे, आई-वडिलांना सोडून नोकरीच्या नावाने दुसऱ्या शहरात कुटुंबासह स्थानांतरित होणे या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमाकडे वळताना दिसत आहेत. ज्या वृद्धांनी आपल्याजवळ काही पुंजी ठेवली आहे, अशा वृद्धांना खाजगी अनाथालयात जागाही मिळते. परंतु ज्या वृद्धांचा मुलांचे संगोपन करताना संपूर्ण पैसा खर्च झाला आहे. अशा वृद्धांना अनुदानित वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नाही. शहरात होम फॉर एजेड आणि पंचवटी हे शासन अनुदानित वृद्धाश्रम आहेत. दोन्ही वृद्धाश्रमामध्ये १३० वृद्धांच्या निवाऱ्याची सोय आहे. समाजकल्याणच्या माध्यमातून या वृद्धाश्रमांना अनुदान दिले जाते. परंतु २००९ पासून वृद्धाश्रमांना अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे वृद्धांची देखभाल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या वृद्धाश्रमांना कठीण झाले आहे. यासंदर्भात वारंवार समाजकल्याण विभागाला तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आहे त्याच वृद्धांची काळजी घेणे कठीण जात असल्याने नवीन येणाऱ्या वृद्धांचा वृद्धाश्रमांनी प्रवेशच नाकारला आहे.
हक्काच्या अनुदानापासून वंचित
वृद्धापकाळामुळे त्यांचे आजार वाढले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यापेक्षाही त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. वृद्धांसाठी विशेष रुग्णालय नसल्याने दररोज मेडिकलमध्ये चकरा माराव्या लागतात. लहान मुलांसारखी वृद्धांची काळजी घ्यावी लागते. वृद्धांची काळजी आणि सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. दानदाते केवळ अन्न देतात. त्याव्यतिरिक्त इतर खर्च वृद्धाश्रमाला अवघड जात आहे. त्यासाठी शासनाकडे पैशाची मागणी आम्ही करीत आहोत. शासन मात्र बजेटच नसल्याचे सांगून या वृद्धांना हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवत आहे.
-सिस्टर दया, होम फॉर एजेड
अतिशय बिकट अवस्था
स्वत:च्या मायबापाला वृद्धाश्रमात आणताना, स्वत:ची ओळख लपवणारी मुले आहेत. कळवूनही रुग्णालयात पडलेल्या मायबापाला भेटायला कोणी येत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नाही. वाळीत टाकल्यागत अवस्था वृद्धाश्रमातील वृद्धांची झाली आहे. अनेक वृद्ध वर्षानुवर्षे खितपत पडले आहेत. वृद्धांची जबाबदारी केवळ अनाथालयाचीच नाही तर शासन आणि समाजानेही त्यांची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
-डॉ. लता देशमुख, सचिव, मातृ सेवा संघ