गुरुवारी उघडणार कपाट, भक्तांच्या स्वागतासाठी सजू लागली देवस्थाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 08:00 AM2021-10-06T08:00:00+5:302021-10-06T08:00:16+5:30
Nagpur News कोरोना संक्रमणामुळे दीर्घ काळापासून बंद असलेले सर्वधर्मीयांच्या आराधना स्थळांचे कपाट गुरुवारी, ७ ऑक्टोबरपासून उघडणार आहे.
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दीर्घ काळापासून बंद असलेले सर्वधर्मीयांच्या आराधना स्थळांचे कपाट गुरुवारी, ७ ऑक्टोबरपासून उघडणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देवस्थाने भक्तांसाठी उघडण्याचा निर्णय घेतल्याने मातेच्या स्थळांसोबतच अन्य देवांच्या मंदिरांचे व्यवस्थापन तयारीला लागले आहे. शासन निर्देशिकांचे पालन करणे आणि भक्तांना संसर्गापासून वाचविण्यासोबतच भक्तांच्या भावनेचा गहिवर याचीदेही याचीडोळा बघण्यास देवस्थाने सज्ज झाली आहेत.
श्री आग्याराम देवी मंदिर
श्री आग्याराम देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, भक्तांच्या स्वागतासाठी पेंडॉल उभारले जात आहेत. मंदिराच्या अंतर्गत भागात सजावट केली जात असून, भक्तांतर्फे अर्पित ९२ किलो चांदीचे मंदिर आकर्षणाचे केंद्र असणार आहे. या चांदीच्या मंदिराच्या निर्मितीसाठी कोल्हापूरचे कारागीर आले होते. नवरात्रोत्सवात गणेशपेठ पोलीस स्टेशनकडून सुरक्षा पुरवली जाणार असून, ८७ पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. यासोबतच भक्तांसाठी आरोग्य सेवाही तैनात करण्यात आली आहे.
श्री गीता माता मंदिर
कॉटन मार्केट येथे असलेल्या श्री गीता माता मंदिरात घटस्थापनेसह अखंड मनोकामना ज्योत सामूहिकरित्या प्रज़्ज्वलित केली जाणार आहे. भक्तांच्या स्वागतासाठी शामियाना उभारण्यात आला असून, साजसज्जेचे काम सुरू आहे. व्यवस्थापनाने कर्मचारीही बोलावले आहेेत.
श्री टेकडी गणेश मंदिर
शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री टेकडी गणेश मंदिराचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. शिवाय, येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र तो अगदी साध्या पद्धतीने होणार असला तरी, भक्तांच्या स्वागतासाठी व्यवस्थापनाकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. शासन नियमानुसार यंदा प्रसादाचे वितरण केले जाणार नाही.
श्री रेणुका माता मंदिर
सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील इतवारी गांधी पुतळा चौकात असलेल्या पुरातन श्री रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने रंगरंगोटी, सजावटीचे काम सुरू आहे. गर्भगृहात लायटिंगची व्यवस्था केली जात आहे.
श्री भवानी माता मंदिर
पारडी येथील यादवकालीन श्री भवानी माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. भक्तांच्या स्वागतासाठी पेंडॉल उभारण्यासोबतच त्यांची यथायोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कठडे उभारण्यात येत आहेत. रंगरंगोटीचे काम पार पडले आहे.
श्री संत ताजुद्दीन बाबा स्मृती मंदिर
सक्करदरा येथे असलेल्या श्री संत ताजुद्दीन बाबा स्मृती मंदिरातही भक्तांच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, गर्दीचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने व्यवस्था लावली जात आहे.
श्री तुळजा भवानी मंदिर
मनीषनगर येथे असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरातही भक्तांच्या स्वागताची व्यवस्था लावली जात आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी सकाळी ५ वाजता देवस्थानचे कपाट उघडले जातील. त्यानंतर अभिषेक, शृंगार करून घटस्थापना होईल.
शासनाने पुनर्विचार करावा - गिरीश व्यास
७ ऑक्टोबरपासून देवस्थाने उघडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतयोग्य आहे. मात्र, त्यावर लादलेली बंधने घातक आहेत. ६० वर्षांवरील वृद्धांना मंदिर प्रवेश टाळण्यात आलेल्या निर्णयावर कटाक्ष टाकताना, श्री आग्याराम देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी, शासनाने अशा निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. देवीला ओटी भरली जाते. मात्र, शासनाने देवीला भेट, पुष्प चढविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे, फुले-प्रसाद-पूजा साहित्य विक्रेत्यांना अजूनही संकटाचाच सामना करावा लागत असल्याचेही व्यास यावेळी म्हणाले.
शासनाचा कोविड प्रोटोकॉल...
- गर्भवती महिला, १८ वर्षांखालील व ६० वर्षांवरील नागरिकांना मंदिर प्रवेश बंदी.
- आधार कार्ड अनिवार्य. ओळखपत्र असलेल्यांना दर्शनासाठी सोडले जाईल.
- मास्क अनिवार्य.
- भक्तांना कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक.
- मंदिर व्यवस्थापनाकडून फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरची व्यवस्था करणे गरजेचे.
- दर्शनाकरिता एकावेळी किमान लोक सोडावेत.
..............