हजार नागपूरकरांना कोव्हॅक्सिनचा डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:10+5:302020-12-03T04:18:10+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. यासाठी हजार स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया सुरू असताना यातील २५० स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. विशेष म्हणजे, यात पाच टक्के डॉक्टरांचा समावेश आहे. शिवाय, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्या परंतु मागील तीन महिन्यांपासून तो नियंत्रणात असलेल्या रुग्णांनाही ही लस दिली जात आहे.
भारत बायोटेकच्या ‘कोेव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीला राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याने आता तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. भारतात २४ हॉस्पिटलमधून २५,५०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. या टप्प्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांना वगळण्यात आले आहे. राज्यात मुंबईच्या सायन हॉस्पिटल व नागपुरातील सीए रोडवरील रहाटे हॉस्पिटलकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘कोव्हॅक्सिन’ नागपूरचे रिसर्च हेड डॉ. आशिष ताजणे यांनी सांगितले, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंद होऊनही ज्यांना ही लस मिळाली नाही अशा बहुसंख्य स्वयंसेवकांनी तिसऱ्या टप्प्यातील लसीसाठी पुढाकार घेतला आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. ही लस १८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना दिली जात आहे. ६६ वर्षांवरील व्यक्तींना त्यांची व्हिडिओद्वारे परवानगी घेऊन समावेश केला जात आहे. ही लस मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांनाही दिली जात आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून या आजारावर नियंत्रण असले पाहिजे. या शिवाय, हृदयविकार, मूत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्यांनाही तपासणीनंतर ही लस देता येते. परंतु या रुग्णांचीही प्रकृती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर असण्याची अट आहे.
-दुसरा डोज ३० दिवसानंतर
डॉ. ताजणे म्हणाले, पहिला डोज आता दिल्यानंतर त्या दिवसापासून ३० दिवसानंतर स्वयंसेवकांना दुसरा डोज दिला जाईल. लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर व ॲन्टिबॉडी चाचणी केली जाते. या सामान्य असल्यावरच लस दिली जात आहे. पहिल्या डोजनंतर ४२व्या दिवशी पुन्हा रक्ताची तपासणी करून अॅन्टिबॉडीज तपासले जातील. त्यानंतर निष्कर्षावर पोहचले जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्वच स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्यानेच तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या निष्कर्षानंतर ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.