डोस पोहोचलेच नाहीत, केंद्रावरून अनेक लाभार्थी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:56+5:302021-06-10T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहीम संथ पडली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहीम संथ पडली आहे. आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्र वगळता समाज भवन, मंदिर, शाळा अशा ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर डोसची व्यवस्था करताना अधिकारी मेटाकुटीला आले आहेत. सक्रिय नगरसेवकांमुळे काही केंद्रांवर लसीकरण होत आहे.
वाठोडा परिसरातील शीतला माता देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर बुधवारी दुपारी १.३० पर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती व परिचारिका नव्हती. या केंद्रावर अनेकजण सकाळपासून चकरा मारून परत जात होते. केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडील रजिस्टरमध्ये नाव नोंदविले. प्रभागाचे नगरसेवक बंटी कुकडे यांच्याकडे तक्रार केली. ते दुपारी एकच्या सुमारास केंद्रावर पोहोचले असता येथील परिचारिकेला दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. दुसरी परिचारिका आली नव्हती. तसेच लस उपलब्ध झाली नव्हती. नेहरूनगर झोनचे प्रमुख डॉ. झरारिया यांच्याशी संपर्क केला. त्या काही वेळात पोहोचल्या. दर्शन कॉलनी केंद्रावरील परिचारिकेला डोस घेऊन बोलावले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास लसीकरण सुरू झाले.
महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेली व्यवस्था पुरेशी नाही. संगणक लावले; परंतु डाटा एंट्रीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही. लसीकरण मोहीम सुरू होताच हे केंद्र सुरू करण्यात आले. येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत होती; परंतु मागील काही दिवसांत लसपुरवठा होत नसल्याने त्रास वाढला, याकडे महापालिकेच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.