रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठी दुप्पट वसुली, कंत्राटदाराकडून वाहनधारकांची लूट

By नरेश डोंगरे | Published: January 12, 2024 10:31 PM2024-01-12T22:31:16+5:302024-01-12T22:31:31+5:30

रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ पार्किंगचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एका कंत्राटदाराला दिले आहे.

Double charging for parking at railway station, looting of motorists by the contractor | रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठी दुप्पट वसुली, कंत्राटदाराकडून वाहनधारकांची लूट

रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठी दुप्पट वसुली, कंत्राटदाराकडून वाहनधारकांची लूट

नागपूर : मुख्य रेल्वेस्थानकावर असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी कंत्राटदाराच्या माणसांकडून वाहनधारकाची लूट केली जात असल्याचा प्रकार आज पुन्हा उघड झाला आहे. रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कंत्राटदाराकडून दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे. त्याची पुराव्यासह रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडे तक्रार करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ पार्किंगचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एका कंत्राटदाराला दिले आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एक दुचाकी पार्किंग करण्यासाठी अर्ध्या तासाला १० रुपये शुल्क घेण्याची कंत्राटदाराला मुभा आहे. मात्र, कंत्राटदाराची माणसं दुचाकीचालकांकडून सर्रास २० रुपये वसूल करतात. भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांच्याकडून अशाच प्रकारे १० ऐवजी २० रुपये वसूल करून पार्किंगमधील व्यक्तीने त्यांना आज २० रुपयांची पावती दिली. 

पार्किंगचे दर १० रुपये असताना २० रुपये कसे काय घेता, असा प्रश्न केला असता, त्या व्यक्तीने आधी वाद घातला आणि नंतर पावती परत द्या, १० रुपये परत करतो, असे म्हटले. शुक्ला यांनी या गैरप्रकाराची तक्रार रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे, तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांकडे केली. या तक्रारीची रेल्वे प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते, त्याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीसुद्धा येथे चालणारा अवैध वसुलीचा प्रकार उघडकीस आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही झाल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी यादव नामक कंत्राटदाराला त्यासंबंधाने नोटीस देऊन कारवाईची तंबीही दिली. मात्र, अवैध वसुलीचा प्रकार बंद झालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनातीलच कुणाचा तरी कंत्राटदाराच्या पाठीवर हात असावा, असा संशय शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. हे कंत्राट रद्द करून दुचाकीधारकांची लूट थांबवावी, अशी मागणीही वरिष्ठांकडे दिलेल्या तक्रारीतून शुक्ला यांनी केली आहे.

रोज उकळले जातात ८० हजारांवर रुपये
मध्यवर्ती स्थानकावर रोज ६० ते ७० हजार प्रवासी येतात. काही बाहेरगावी जाण्यासाठी, तर काही आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा बाहेरून आलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींना घेण्यासाठी स्थानकावर येतात. ते पार्किंगमध्ये दुचाकी लावतात. अशा प्रकारच्या २४ तासांतील दुचाकीधारकांची संख्या साधारणत; ८ ते १० हजार ठरावी. प्रत्येकाकडून जास्तीच्या १० रुपयांचा हिशेब लावल्यास कंत्राटदारांची माणसं ठरविलेल्या पार्किंग शुल्काव्यतिरिक्त रोज ८० हजार ते १ लाख रुपये जास्तीचे उकळतात.
 

Web Title: Double charging for parking at railway station, looting of motorists by the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.