सोलर रुफ टॉपला मिळाले डबल क्रेडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:15 AM2019-05-17T00:15:32+5:302019-05-17T00:16:37+5:30
महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलमध्ये त्यांना झटका लागणार आहे. कारण अतिरिक्त क्रेडिट परत घेण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलमध्ये त्यांना झटका लागणार आहे. कारण अतिरिक्त क्रेडिट परत घेण्यात येईल.
सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रुफ टॉपची संकल्पना सुरू केली आहे. भरभक्कम वीज बिल पाहून अनेक ग्राहकांनी आपापल्या प्रतिष्ठांनामध्ये सोलर रुफ टॉप लावले आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या क्षेत्रात असे १४५० ग्राहक आहेत. या ग्राहकांचे मीटर अत्याधुनिक आहेत. मीटर रीडर दर महिन्यात इम्पोर्ट (महावितरणकडून घेण्यात आलेली वीज), एक्सपोर्ट (महावितरणच्या ग्रीडमध्ये देण्यात आलेली सौर ऊर्जेद्वारा निर्माण केलेली वीज) आणि जनरेशन (रुफ टॉपमधून तयार होणारी वीज) चे युनिट नोंदवतात. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यानंतर जर एक्सपोर्ट अधिक असेल तर ग्राहकांना अतिरिक्त निधी क्रेडिट केला जातो. अशा परिस्थितीत ग्राहकांचे वीज बिल शून्य किंवा मायनस येते. आतापर्यंत महावितरणच्या बिलिंग यंत्रणेद्वारा येथेच चूक झाली. एप्रिलमध्ये त्यांनी अतिरिक्त युनिट क्रेडिट केले होते. परंतु काही ग्राहकांच्या बिलामध्ये हे क्रेडिट होऊ शकले नाही. तक्रार केल्यावर झालेली चूक सुधारण्यात आली. परंतु मे मध्ये मिळणाऱ्या बिलामध्ये पुन: क्रेडिट देण्यात आले.
एसएनडीएलने नोंदवली तक्रार
वीज वितरण फ्रेन्चाईजीने ग्राहकांच्या खात्यामध्ये डबल क्रेडिट झाल्याची तक्रार महावितरणडे केली आहे. कंपनीने अशा ग्राहकांचे बिल महावितरणला देऊन समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महावितरणने पुन्हा एकदा आपली चूक मान्य करीत पुढच्या बिलमध्ये सर्व काही व्यवस्थित होईल, असे स्पष्ट केले आहे.
सेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणालीची तिसरी चूक
सेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणालीत ही तिसऱ्यांदा मोठी चूक झाली आहे. सर्वात अगोदर एसएनडीएलच्या परिसरातील ग्राहकांचे मीटर फोटो ऑनलाईन गायब करण्यात आले. यानंतर २० टक्के वीज ग्राहकांना सेक्युरिटी डिपॉजिटचे व्याज दोन वेळा देण्यात आले. आता सोलर ग्राहकांना सुद्धा डबल क्रेडिट देण्यात आले. महावितरणने अलीकडेच सेेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणाली सुरु केली आहे. याअंतर्गत सर्व वीज बिल मुंबई येथील मुख्यालयात तयार होत आहेत. स्थानिक कार्यालय त्याला केवळ डाऊनलोड आणि प्रिंट काढून ग्राहकांना वितरित करीत आहेत.