डबल डेकर पुलाची लांबी ५.३ कि़मी.
By admin | Published: July 5, 2017 02:00 AM2017-07-05T02:00:26+5:302017-07-05T02:00:26+5:30
मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंतचा एक कि़मी. भूमिगत मार्ग मेट्रो रेल्वेने रद्द केला असून,
नागपुरातील सर्वात मोठा उड्डाणपूल : पूल बांधण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंतचा एक कि़मी. भूमिगत मार्ग मेट्रो रेल्वेने रद्द केला असून, आता त्याऐवजी मॉरिस कॉलेज ते कामठी मार्गावर आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ५.३ कि़मी. थेट डबल डेअर पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल नागपुरातील सर्वात मोठा ठरणार आहे.
यापूर्वी मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंत भूमिगत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी राईटस् कंपनीने सर्वेक्षण करून अहवाल चार महिन्यांआधी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सादर केला होता. त्यावर खर्चाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्यात आला. एक कि़मी.चा मार्ग बांधण्यासाठी ६५४ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. हा खर्च उड्डाणपूल बांधण्याचा चारपट होता. तो परवडणारा नव्हता. त्यामुळेच भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्द करून या मार्गावर डबल डेकर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुलभ होणार आहे.
या मार्गावरील वाहतूक आणि अरुंद रस्त्यामुळे उड्डाणपूल बांधणे मोठे आव्हान ठरणार आहे. भूमिगत मार्ग बांधणे हे खर्चित आणि आव्हानात्मक काम करण्यामुळे भूमिगत मार्गाऐवजी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
याचप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने एकत्रितरीत्या डिझाईन केलेला ३.४१ कि़मी.चा डबल डेबर व्हायडक्ट अर्थात उड्डाणपूल वर्धा रोडवर अजनी चौक ते प्राईड हॉटेलपर्यंत बांधण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. या मार्गावर जमिनीपासून ४० फूट अंतरावर मेट्रो धावणार आहे.
मेट्रो रेल्वेचा उत्तर-दक्षिण मार्ग आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान डेपो असा २१.८३३ कि़मी.चा असून, या मार्गावर १७ स्टेशन राहणार आहेत. याशिवाय मिहान डेपो ते जामठापर्यंत आणखी तीन स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर-दक्षिण मार्गावर कामठी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, झिरो माईल्स, सीताबर्डी, अभ्यंकर रोड, नाग नदीवरून हम्पयार्ड रोड, अजनी, जेल रोड, रहाटे कॉलनी रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, विमानतळ, मिहान डेपो असा मेट्रो रेल्वेचा प्रवास राहणार आहे.