असा बनतोय नागपूर मेट्रोचा डबल डेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:46 PM2018-02-01T14:46:00+5:302018-02-01T14:48:56+5:30

वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे.

Double-decker of Nagpur Metro | असा बनतोय नागपूर मेट्रोचा डबल डेकर

असा बनतोय नागपूर मेट्रोचा डबल डेकर

Next
ठळक मुद्देरिब अ‍ॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा उपयोग: नागपुरातील पहिलाच पूल

आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे. या पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पुलाचे बांधकाम नेमके कोणत्या पद्धतीने केले जात आहे, हा अनेकांच्या मनात असलेला प्रश्न ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी रिब अ‍ॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारला जात असल्याचे समोर आले. काय आहे हे तंत्रज्ञान जाणून घेऊ या.
या पुलाचे बांधकाम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन ३५० कोटी रुपये खर्च करून नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. सोनेगाव पोलीस स्टेशनच्या समोरून अजनी चौकातील खासगी इस्पितळाजवळ डबलडेकर पुलाचे बांधकाम जोरात सुरू आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या पुलावर वाहने चालतील व वरच्या पुलावरून मेट्रो धावणार आहे. मात्र, मेट्रोचे पिलर दोन-दोन पुलांचा भार कसा सहन करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काहींच्या मनात याची धास्तीही निर्माण झाली आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नाही. या पुलाचे बांधकाम करताना प्रमुख चार पैलूंवर लक्ष देण्यात आले आहे. सर्वात पहिला म्हणजे हाय टेन्साईल स्ट्रेंड वायर. हा एका विशेष प्रकारचा वायर असून देशात फक्त टाटा स्टील व उषा मार्टिन कंपनीतर्फेच तयार केला जातो. ८ एमएम जाडीच्या या वायरला गरम करून ठोकून २.३ एमएमचे केले जाते. यानंतर एका वायरच्या चारही बाजूंनी सहा वायर लावले जातात. मध्यभागी असणारा वायर सरळ असतो तर इतर वायर दोरीसारखे गुंडाळले जातात. यामुळे हा वायर अधिक मजबूत होतो. या पूर्म सेटला एक स्ट्रेंड म्हटले जाते. एलिवेटेड मेट्रो रुटसाठी बनविण्यात आलेल्या स्ट्रक्चर (स्लॅब) मध्येही हेच स्ट्रेंड वापरण्यात आले आहेत. डबल डेकर पुलातही याचा उपयोग केला आहे.
डबल डेकर पुलात खालच्या पुलाला दोन भागात विभागले आहे. एक स्पाईन व दुसरा रिब आहे. स्पाईन ही दोन पिलरच्या मधोमध लावलेली स्लॅब आहे तर रिब स्पाईन ही दोन्हीकडून लागणारी स्लॅब आहे. स्पाईनमध्ये मधला भाग पोकळ असतो. याच्या खालच्या भागात मोठमोठो खड्डे असतात. जेव्हा दोन पिलरच्या मध्ये सर्व स्पाईन लागतात तेव्हा सर्व खालच्या भागातील छिद्रांमधून हाय टेन्साईल स्टॅण्ड वायर टाकून त्याला जोरात ओढून ‘लॉक’ केले जाते. यामुळे सर्व स्पाईन आपसात घट्ट चिटकून एका स्ट्रक्चरचे रुप धारण करतात. स्पाईन प्रमाणेच रिब मध्येही वरच्या भागात छिद्र असतात. यातही हाय टेन्साईल स्ट्रेंड वायर टाकून तिला जोरात ओढून ‘लॉक’ केले जाते. या प्रक्रियेला ‘प्री स्ट्रेसिंग’ म्हटले जाते. एखाद्या धाग्यात मोती टाकून त्याला ओढून बांधण्यासारखीच ही प्रक्रिया असते. पुलाच्या स्पाईनच्या आतील भाग पोकळ ठेवण्याचेही एक कारण आहे. यामुळे पुलाचे वजन तर कमी होतेच पण सोबतच भविष्यात ड्रेनेज व अन्य कामासाठी ही जागा वापरता येणार आहे.
मेट्रो रेल्वेच्या सामान्य पिलरच्या तुलनेत डबल डेकर पुलाच्या पिलरच्या बांधकामासाठी बरेच बदल करण्यात आले आहेत. सामान्य मेट्रो पिलरच्या बांधकामासाठी जमीन खोदून चार पायवे बनविले जातात. यानंतर जमिनीवर चबुतरा उभारून मध्ये मेट्रो पिलर उभारला जातो. डबल डेकर पुलाच्या पिलरसाठी जमीन खोदून आठ पायवे तयार केले जातात. यानंतर चबुतरा तयार करून पिलर उभारला जातो. याची जाडी सामान्य पिलरपेक्षा अधिक असते. यामुळे पिलर पुलाचे वजन सहन सहन करतो.
पिलर किती वजन सहन करणार ?
 डबल डेकर पुलामध्ये खालचा पूल ७२५ टन व वरचा मेट्रोचा पूल ४०० टनासह एकूण ११२५ टन वजन सहन करेल. याशिवाय या पुलावरून धावणाऱ्या  दोन मेट्रो रेल्वे, अन्य वाहनांचे वजन, त्यातून होणारे व्हायब्रेशन हा सर्व भार हा पिलर सहन करणार आहे.
जामठा येथे तयार होत आहेत स्पाईन व रिब
 जामठा येथील कास्टिंग यार्डमध्ये डबल डेकर ब्रिजचे स्पाईन (मधली स्लॅब) व रिब (स्पाईनच्या दोन्हीकडील स्लॅब) तयार होत आहे. तयार झाल्यानंतर त्यांना मोठ्या क्रेनच्या साहाय्याने साईटवर आणून लाँचिंग गर्डरच्या मदतीने पिलरच्या मध्ये लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही भाग असेल सहा लेनचा
 डबल डेकर ब्रिज, पिलर नंबर ४१ ते ५७ पर्यंत ६ लेनचा राहील. यामुळे मनीषनगर रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपासचा ब्रिज येऊन जोडल्या जाईल. या भागात ४८० मीटरचा हा पूल ६ लेनचा असेल. याची रुंदी २६.५ मीटर राहील. उर्वरित पूल चार लेनचा असेल. याची रुंदी १९.५ मीटर राहील.

 

 

Web Title: Double-decker of Nagpur Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.