डबल मर्डर
By admin | Published: May 1, 2016 02:52 AM2016-05-01T02:52:08+5:302016-05-01T02:52:08+5:30
खामला चौक स्थित पराते सभागृहाजवळ दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा सिमेंट कॉँक्रिटच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला.
खामल्यात थरार : जुन्या वादातून खुनाचा संशय
नागपूर : खामला चौक स्थित पराते सभागृहाजवळ दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा सिमेंट कॉँक्रिटच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते १.३० वाजताच्या दरम्यान घडली. पहाटे ४ वाजता पोलिसांनी आरोपींना अटक केली.
अविनाश सुरेश डे (२४)रा. जुनी वस्ती खामला आणि त्याचा मित्र कुलदीप चंद्रकांत तिवारी (१७) धरमपेठ अशी मृतांची नावे आहेत. तर आरोपींमध्ये आॅरेंज सिटी हॉस्पिटलजवळील दंतेश्वरीनगर झोपडपट्टी खामला येथील जमशेर सरफुद्दीन अंसारी (२२), गणेश राधेश्याम आगरे (२०), सलमान, रहेमान आणि काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. जमशेर व गणेश हे मुख्य आरोपी आहेत. मृत अविनाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो नुकताच तडीपार झाला होता. त्याच्यावर घरफोडी, चोरीसह एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. तसेच कुलदीपवरही ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रकारे खुनाचा मुख्य सूत्रधार जमशेर अंसारी याच्यावरही घरफोडी आणि चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. मृत अविनाश याचे वस्तीतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसापूर्वीच तो त्या मुलीला घेऊन पळाला होता. त्याच्याविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. परंतु तो मुलीसोबत परत आला होता.
शुक्रवारी रात्री प्रत्यक्षदर्शीनुसार आरोपींनी अविनाश व त्याचा मित्र कुलदीपला रात्री १२ वाजता पराते सभागृहाजवळ चर्चा करायला बोलावले होते.
आरोपी हे कुलदीपला मारण्याच्या उद्देशानेच आले होते. त्यांनी कुलदीपसोबतच वाद सुरू करीत त्याला मारायला सुरुवात केली. अविनाशने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारण्यात आले.
अर्धनिर्मित इमारत आश्रयस्थळ
नागपूर : खाली पडलेल्या दोघांच्याही डोक्यावर सिमेंट काँक्रिटचा दगड मारून त्यांचा खून केला. मीता डे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. शनिवारी सकाळी ४ वा. आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
खामला येथील पराते हॉलजवळ ज्या ठिकाणी हे दुहेरी हत्याकांड घडले ते स्थळ म्हणजे एक अर्धनिर्मित इमारत होती.
ही इमारत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आश्रयस्थान बनली आहे. येथील नागरिकांनी याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. मृत अविनाशसोबत घटनेप्रसंगी त्याची प्रेयसी ही रात्री उशिरापर्यंत होती. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)
कुलदीप व जमशेरमध्ये होता वाद
डीसीपी शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, कुलदीप व जमशेर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. असे असतानाही कुलदीप जमशेरच्या वस्तीत जाऊन फिरत होता. आरोपी मृताला मारत असताना अविनाशची प्रेयसीसुद्धा घटनास्थळी होती. मारहाण होत असल्याचे पाहून ती अविनाशच्या घरी गेली व त्यांना सांगितले. त्यानंतर अविनाशच्या घरच्यांनी पोलिसांना सूचना दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आल्याबरोबर त्यांनी कुलदीपवर हल्ला केला. ते कुलदीपलाच मारायला आले होते. अविनाशने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारण्यात आले. परंतु खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलीस शोधताहेत कारणे
डीसीपी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीत खुनाचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते घरफोडी व चोरीच्या घटनेत सहभागी आहेत. यातून त्यांनी काही गुन्हे सोबत मिळून केले असावेत, त्यातून पैशाची देवाण-घेवाण किंवा तरुणीवरून काही वाद झाला का? याबाबत गांभीर्याने तपास केला जात आहे. एक-दोन दिवसात खरे कारण स्पष्ट होईल.