नागपुरात ‘डबल मर्डर’, पैशांच्या वादातून मित्रांचाच ‘गेम’
By योगेश पांडे | Published: February 2, 2024 05:06 PM2024-02-02T17:06:28+5:302024-02-02T17:08:30+5:30
पोलीस आयुक्तांना रक्तरंजित सलामी.
योगेश पांडे ,नागपूर : नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहरातील गुन्हेगारीतून त्यांना रक्तरंजित सलामीच मिळाली. पैशांच्या वादातून दोन मित्रांची हत्या करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली होती. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सनी धनंजय सरुडकर (३३, जलालपुरा, गांधीबाग) व कृष्णकांत भट (२४, नंदनवन) अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघेही मित्र होते. ते फायनान्सचे काम करायचे व व्याजानेदेखील पैसे द्यायचे. त्यांनी आरोपी किरण शेंडे (३०, साईबाबानगर) व योगेश शेंडे (२५, साईबाबानगर) यांना कर्जाने पैसे दिले होते. हे दोघेही भाऊ असून एका मोटर डिलरकडे कामाला आहेत. आरोपींनी दोघाही मृतकांकडून पैसे घेतल्यावर काही कालावधीने हफ्ते देणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. सनी व कृष्णकांत यांनी दोघांनाही अनेकदा पैशांबाबत विचारणा केली. मात्र ते टाळाटाळ करायचे.
दोन्ही आरोपींनी चर्चेसाठी गुरुवारी रात्री कृष्णकांत व सनीला साईबाबानगर येथील घरी बोलविले. दोघांनीही आरोपींना अगोदर पैसे द्या अशीच भूमिका घेतली. त्यामुळे वाद वाढला. त्यावेळी आरोपींचे दोन साथीदारदेखील तेथे होते. काही वेळातच हाणामारी सुरू झाली. यातूनच आरोपींनी दोघांवरही राफ्टरने वार केले. दोघे खाली कोसळल्यावरदेखील आरोपी त्यांच्या डोक्यावर प्रहार करतच होते. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याची शाश्वती झाल्यावर आरोपी पळून गेले. दरम्यान आरडाओरड ऐकून परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळच्या सुमारास चारही आरोपींना अटक करण्यात आली.