नंदनवनमध्ये दुहेरी हत्याकांड

By Admin | Published: August 22, 2015 02:52 AM2015-08-22T02:52:36+5:302015-08-22T02:52:36+5:30

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसाढवळ्या दुहेरी हत्याकांड घडले. मारेकऱ्यांनी जावई आणि त्याच्या मेव्हण्याचे गळे कापून निर्घृण हत्या केली.

Double murder in Paradise | नंदनवनमध्ये दुहेरी हत्याकांड

नंदनवनमध्ये दुहेरी हत्याकांड

googlenewsNext

जावई आणि मेव्हण्याची निर्दयपणे हत्या : गळे कापले
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसाढवळ्या दुहेरी हत्याकांड घडले. मारेकऱ्यांनी जावई आणि त्याच्या मेव्हण्याचे गळे कापून निर्घृण हत्या केली. पुनित्री हेमराज गौतम (वय ३६, रा. पारडी पुनापूर) आणि सोमेश्वर लक्ष्मण पटले (वय २६, सडक अर्जुनी) अशी मृतांची नावे आहेत.
पटले आणि गौतम आणि त्यांचे अन्य नातेवाईक शेतातील गवत कापण्याचे तसेच कचरा साफ करण्याचे काम करतात. ते सध्या कळमन्यात वास्तव्याला होते. शुक्रवारी दुपारी या दोघांचा नातेवाईक पृथ्वीराजच्या मोबाईलवर फोन आला. शेतातील गवत कापायचे आहे, असे सांगून पलिकडून बोलणाराने कंत्राट घेणार का म्हणून विचारणा केली. पृथ्वीराजने होकार देऊन चर्चेसाठी कळमन्यात बोलविले.
त्यानुसार काही जण आले आणि त्यांच्यासोबत गौतम आणि पटले काम बघायला निघून गेले. सायंकाळ झाली तरी ते परतले नाही. त्यामुळे पृथ्वीराज आणि अन्य नातेवाईकांनी या दोघांच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड मार्गावर तरोडी बुजुर्ग शिवारात दोन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची चर्चा परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघे गर्दी करू लागले. कुणी एकाने नंदनवन ठाण्यात फोन करून ही माहिती दिली.
त्यानंतर सायंकाळच्या वेळी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी दोन्ही मृतदेह रुग्णालयात रवाना केले. (प्रतिनिधी)
तो फोन करणारा कोण
गवत कापणीचे काम द्यायचे आहे, असे सांगून ज्याने फोन केला तो कोण, तसेच ज्याने गौतम आणि पटलेला सोबत नेले, ते कोण होते, त्याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.मारेकऱ्यांनी दोघांचेही गळे कापले आणि पायांची हाडे मोडली. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून किंवा द्वेषभावनेनेच या दोघांची हत्या मारेकऱ्यांनी केली असावी, असा कयास आहे.
कारण गुलदस्त्यात
नंदनवनमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याचे कळताच अनेक वरिष्ठांनी घटनास्थळ आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांकडून आरोपींबाबत माहिती मिळवण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांचा कुणाशी जीव घेण्यापर्यंतचा वाद असल्याचे कुटुंबीयांनी नाकारले. दोघेही मजुरी करीत असल्यामुळे त्यांच्याकडे फारशी रक्कम अथवा दागिनेही नव्हते. त्यामुळे लुटमारीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे हत्याकांड कोणत्या कारणावरून घडले, ते गुलदस्त्यात आहे.

Web Title: Double murder in Paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.