लहान व्यापाऱ्यांकडून व्हॅटची दुहेरी आकारणी
By admin | Published: September 7, 2015 02:56 AM2015-09-07T02:56:56+5:302015-09-07T02:56:56+5:30
व्हॅटमुळे लहान व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विभागाचा ससेमिरा आमच्या मागे लागण्याचा आरोप नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे.
व्हॅटमुळे व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास : विक्रीकर विभागाच्या नोटिसा
नागपूर : व्हॅटमुळे लहान व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विभागाचा ससेमिरा आमच्या मागे लागण्याचा आरोप नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे.
व्हॅटचा कायदा आला त्यावेळी सरळसोप्या पद्धतीने कर भरावा लागणार, असे लहान व्यापाऱ्यांना वाटले होते. पण मानसिक त्रास वाढला. बहुतांश लहान व्यापारी अल्पशिक्षित आणि मातृभाषा जाणणारा आहे. त्यांना मिळणारे नोटीस इंग्रजी भाषेत आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांना सीएंच्या दारात तासन्तास उभे राहावे लागते. एखाद्या पार्टीकडून अथवा कंपनीकडून माल विक्रीसाठी घेतला आणि त्याने व्हॅटचा भरणा केला नाही तर विक्रीकर विभाग सरसकट लहान व्यापाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्याकडून व्हॅटची सक्ती करीत आहेत. ही बाब सत्य आहे की, मोठे व्यापारी किंवा कंपनीकडून माल विकत घेताना लहान व्यापारी व्हॅटचा भरणा आधीच करतात. अशावेळी व्हॅटची दुहेरी सक्ती लहान व्यापाऱ्यांवर का? असा सवाल नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी लोकमतशी बोलताना केला.
लहान व्यापाऱ्यांकडे गुन्हेगारांसारखे पाहिले जाते. अनेक व्यापारी शासकीय कार्यालयाचा ससेमिरा नको म्हणून कर्जबाजारी होऊन कायद्यातील त्रुटींना बळी पडून व्हॅटचा दुहेरी भरणा करीत असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. व्यापारी कर देण्यास तयार आहे. पण कायदा सुटसुटीत असावा. व्यापाऱ्यांना मानसिक त्रास होणार नाही आणि त्यांची प्रगती होईल, असा कायदा शासनाने तयार करावा. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लहान व्यापारी बळी पडत असल्याची खंत रक्षक यांनी व्यक्त केली. शासनच नव्हे तर विक्रीकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला समजत नाहीत. कर वसुलीसाठी अधिकारी थेट कायद्यावर बोट ठेवतात. कायदा व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे का, याची शहानिशा करण्याची गरज आहे. मोठ्यांना सोडून लहान व्यापाऱ्यांना फाशी देणे सरकारने सोडून द्यावे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरपराध नागरिकाला शिक्षा होऊ नये, या युक्तीनुसार अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे, अशी मागणी रक्षक यांनी केली. सध्या लहान व्यापारी अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या वसुलीमुळे त्रस्त आहेत. विक्रीकर कार्यालयातून रोज कुणीतरी फोन करतो आणि व्यापाऱ्यांना धमकावतो. त्यामुळे व्यापारी घाबरले आहेत. अधिकाऱ्यांनी सक्तीची कारवाई करू नये, अशी मागणी रक्षक यांनी केली.(प्रतिनिधी)