दुप्पट रकमेचे आमिष, आठवड्याला कॅश अन् शेवटी लाखोंनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 09:05 PM2022-02-16T21:05:57+5:302022-02-16T21:07:24+5:30
Nagpur News गुंतवणूक केलेली रक्कम १८ महिन्यात दुप्पट करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
नागपूर : गुंतवणूक केलेली रक्कम १८ महिन्यात दुप्पट करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात १७.८५ लाखांनी फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. तपासात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. विनोद दादाजी उपरे (५०, द्वारका अपार्टमेंट खामला), शैलेश तल्हार (४५, मनीषनगर), पुरुषोत्तम चाचरे (३०, जुनी कामठी), मंगला अंबोलकर (५०), ऋषिकेश अंबोलकर (५५, पायोनिअर सोसायटी), प्रमोद डोंगरे (गडचिरोली), अतुल डोंगरे (हुडकेश्वर), समीर जैन (२५, प्रतापनगर), मोहन राणा (४५) आणि इंदू राणा (३८, गुलमोहर हॉल, खामला) अशी आरोपींची नावे आहेत. विनोद उपरे असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
उपरेने २०२० मध्ये ट्रेड मनी कंपनी सुरू केली. त्यात इतर आरोपींना सामील केले. आरोपी नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. त्यांनी गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम ठरवून दिलेल्या काळापर्यंत जमा केल्यास १८ आठवड्यांनंतर दुप्पट रक्कम परत देण्याची बतावणी केली. त्यांनी दुप्पट रक्कम देण्यासोबतच प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यंकटेशनगर येथील रहिवासी राकेश चौरागडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यात गुंतवणूक केली.
सुरुवातीला आरोपींनी गंतवणूकदारांना पैसे परत केले. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली. चौरागडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींकडे ६ लाख रुपये गुंतविले. त्यांनी ठरलेल्या वेळेवर पैसे परत करण्याची मागणी केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. चौरागडे यांना आरोपींनी इतर नागरिकांनाही रक्कम परत केली नसल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. आर्थिक शाखेला तपासात आरोपींनी १७.८५ लाखाने फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी षडयंत्र तसेच एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणातील सत्यस्थिती समोर येऊ शकणार आहे.
...............