दुपटीने वाढले प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थी; वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:20 PM2021-07-17T12:20:02+5:302021-07-17T12:20:27+5:30
Nagpur News मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्ये प्रथम व प्राविण्य श्रेणीत सर्वात जास्त नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी शालांत परीक्षेच्या निकालात प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. मात्र मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्ये प्रथम व प्राविण्य श्रेणीत सर्वात जास्त नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण तर दुपटीने वाढले आहे. दुसरीकडे यंदा संधी असतानादेखील बहुतांश पुनर्परीक्षार्थी मात्र श्रेणींपासून दूर राहिले असून ८८ टक्के पुनर्परीक्षार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यंदा जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. मात्र प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या ३१.१० टक्के इतकी आहे.
विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात एकूण १ लाख २५ हजार ६६१ नियमित विद्यार्थ्यांना ६० टक्के किंवा अधिक गुण मिळाले आहेत. एकूण परीक्षार्थ्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ८०.८० टक्के इतकी आहे. यातील ७७ हजार २८६ विद्यार्थी (४९.७० टक्के) केवळ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. प्राविण्य श्रेणीत ४८ हजार ३७५ विद्यार्थी (३१.१० टक्के) उत्तीण झाले आहेत. मागील वर्षी हीच टक्केवारी १५.८९ टक्के इतकी होती. २८ हजार ७०५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.
सर्वाधिक कमी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यात
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३८.९७ टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर नागपूर जिल्ह्यात ३६.१० टक्के विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी १९.५८ टक्के विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ५५.९५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. त्याखालोखाल भंडारा जिल्ह्याचा (५१.१६ टक्के) क्रमांक आहे.
०.७७ टक्के पुनर्परीक्षार्थी प्राविण्य श्रेणीत
पुनर्परीक्षार्थ्यांना यंदा चांगली श्रेणी मिळेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात ६ हजार ६५४ पैकी केवळ ५१ (०.७७ टक्के) पुनर्परीक्षार्थ्यांना प्राविण्य श्रेणी प्राप्त झाली. तब्बल ८८ टक्के विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. ३.९१ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५.३८ टक्के विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.