आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:27 AM2020-06-16T00:27:07+5:302020-06-16T00:29:21+5:30
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेले चारस्तरीय बांधकाम केले जात आहे.
हे बांधकाम अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अशा रेल्वेलाईन गड्डीगोदाम येथील आरयूबी येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयूबी मार्ग) वाहतुकीकरिता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील.
प्रकल्पांची प्रमुख वैशिष्ट्ये :
प्रस्तावित उड्डाणपूल आणि मेट्रो ट्रॅक त्याला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजे या दोन संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलरवर होणार आहे. त्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल.
उड्डाणपूल संरचना एलआयसी चौक येथून सुरू होणार असून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत कामठी रोड अशा व्यस्त मार्गावर आहे.
चारस्तरीय वाहतूक प्रणाली कामठी रोड, नागपूर-भोपाळ रेल्वेलाईन, उड्डाणपूल, मेट्रो व्हायाडक्ट अशी आहे.
मेट्रो व्हायाडक्टची सर्वात जास्त उंची गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ आहे. या ठिकाणी रेल्वेमार्ग रस्त्यावरून जात आहे.
उड्डाणपुलाची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून १४.९ मीटर.
मेट्रो व्हायाडक्टची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून २४.८ मीटर.