कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:25+5:302021-07-05T04:07:25+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना मागील दोन दिवसापासून रुग्ण व मृत्यूसंख्येत किंचित वाढ झाली होती. परंतु शनिवारी ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना मागील दोन दिवसापासून रुग्ण व मृत्यूसंख्येत किंचित वाढ झाली होती. परंतु शनिवारी ४२ रुग्ण आढळून आले असताना रविवारी यात दुपटीने घट झाली. १९ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,१९५ झाली असून, मृतांची संख्या ९,०३१ वर पोहचली आहे. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२२ टक्के आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व डेल्टा प्लसचा धोका ओळखून नागपूर जिल्ह्यात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु बाजारात, दुकानांमध्ये गर्दी कायम आहे. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क अनेक लोक दिसून येत आहेत. याचा धोका होण्याची शक्यता आहे. आज ३१ रुग्ण बरे झाले असून, याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत ४,६८,००० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात १४ तर, ग्रामीणमध्ये ४ रुग्णांची भर
नागपूर जिल्ह्यात रविवारी ८,३५० चाचण्या झाल्या. यात शहरात ६,९७८ चाचण्यांमधून १४ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. दुसऱ्या एका मृत्यूची नोंद जिल्हाबाहेरील रुग्णाची आहे. ग्रामीणमध्ये १,३७२ चाचण्यांमधून ४ रुग्ण आढळून आले. मागील २२ दिवसापासून येथे एकही मृत्यू नाही. सध्या कोरोनाचे १६४ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, १२७ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत.
कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ८,३५०
शहर : १४ रुग्ण व १ मृत्यू
ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७७,१९५
एकूण सक्रिय रुग्ण : १६४
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६८,०००
एकूण मृत्यू : ९,०३१