‘नीट’च्या भरघाेष निकालावर संशयाचे सावट, गैरप्रकाराचा आराेप
By निशांत वानखेडे | Published: June 6, 2024 05:53 PM2024-06-06T17:53:40+5:302024-06-06T17:55:00+5:30
७१८, ७१९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा : पहिल्या रॅंकवर ६७ विद्यार्थी असण्यावरही आक्षेप
निशांत वानखेडे
नागपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजेन्सीतर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा यंदा भरघाेष निकाल लागला आहे. मात्र या भरघाेष निकालावरच संशयाचे सावट पसरले आहे. एकतर यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवून पहिली रॅंक प्राप्त केली, जे यापूर्वी कधीही झाले नाही. दुसरे म्हणजे परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगमुळे ७१८ किंवा ७१९ गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
एनटीए’ने १४ जूनला नीटचा निकाल लावण्याची घाेषणा केली हाेती, मात्र त्याच्या १० दिवसांपूर्वी ४ जून राेजी ऐन लाेकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी अचानक नीटचा निकाल जाहीर केला. परीक्षेत झालेल्या अनियमिततेकडून लाेकांचे लक्ष भटकविण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आराेप हाेत आहे. ५ मे राेजी ही परीक्षा झाली हाेती व त्यावेळी बिहारमध्ये पेपर लिक झाल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या. विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीच्या जुन्या पुस्तकातून अभ्यास चालविला हाेता आणि ऐन ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये पुस्तका बदलण्याची घाेषणा करण्यात आली. आता निकाल जाहीर झाल्यानंतर निकालातही घाेळ केल्याचा आराेप हाेत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिली रॅंक, मिळालेले गुण, वगळलेल्या अभ्यासक्रमातून विचारलेले प्रश्न अशा अनेक आक्षेपांना समाेरे जावे लागत असून ‘एनटीए’ने नीट परीक्षेचा स्तरच घसरविला, असा माेठा आराेप हाेत आहे.
हे आहेत आक्षेप
- तिन्ही विषय मिळून ७२० गुणांचा पेपर. एका प्रश्नाला चार गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंगमुळे उत्तर चुकले तर एक गुण वजा हाेताे. यानुसार एखाद्याने सर्व प्रश्न याेग्य साेडविले तर ७२० गुण मिळतील. मात्र एक प्रश्न साेडला तर ७१६ किंवा उत्तर चुकले तर ७१५ गुण मिळतील. मग अनेक विद्यार्थ्यांना ७१९, ७१८ गुण कसे मिळाले, हा प्रश्न आहे.
- ‘एनटीए’ने परीक्षेदरम्यान नियाेजनाअभावी विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याने त्यांना अतिरिक्त गुण दिल्यामुळे ७१९, ७१८ गुण मिळाल्याची सफाई दिली. मात्र ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांना ग्रेस मार्क देण्यात अर्थ काय, असा सवाल केला जात आहे. एवढ्या माेठ्या परीक्षेत गाेंधळ हाेताे कसा?
- परीक्षेत एका केंद्रावर जवळपासचे बैठक क्रमांक असलेल्या आठ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत. असे एकसारखे गुण मिळाले कसे, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
कट ऑफ ३० गुणांनी वाढेल
या निकालामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल. गेल्या वर्षी सरकारी मेडिकल काॅलेजचा कट ऑफ ५८७ गुणांवर हाेता. यंदा ६३० च्या खाली गुण असलेल्यांना शासकीय महाविद्यालय मिळणे अशक्य वाटते आहे. ७२० च्या खालील विद्यार्थ्यांना एम्स दिल्लीचा प्रवेश शक्यच नाही. सुदैवाने महाराष्ट्रात ३८ मेडिकल काॅलेज व ५१०० जागा आहेत. त्यामुळे येथे नुकसान कमी हाेईल. तसे महाराष्ट्रात ग्रेस गुण एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाहीत.
- आर्यन नायडू, समुपदेशक, मेडिकल अभ्यासक्रम
एनटीएने नीटचा स्तर घटविला
नीटची परीक्षा आणि लागलेला संभ्रमित निकाल पाहता काहीतरी गडबड झाली, हे निश्चित आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात विद्यार्थी पहिल्या रॅंकमध्ये येणे, ७१९, ७१८ गुण मिळणे आश्चर्यकारक आहे. सीबीएसईद्वारे परीक्षा घेईपर्यंत सर्व व्यवस्थित हाेते. एनटीएने नीटचा स्तरच घसरविला आहे.
- डाॅ. समीर फाले, नीट मार्गदर्शक.