रस्ता खाली तर नाली बांधकाम उंचीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:39+5:302021-01-04T04:08:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक येथून उमरेड ते मालेवाडा या सिमेंट महामार्गाचे काम सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक येथून उमरेड ते मालेवाडा या सिमेंट महामार्गाचे काम सुरू आहे. गिरड मार्गाकडे जाणाऱ्या या महामार्गाच्या दुतर्फा दुकाने आणि वसाहत आहे. मार्ग कमी उंचीचा तर नाला व त्यावरील पटाव हे अधिक उंचीवर अशा स्वरूपाचे बांधकाम येथे करण्यात आल्याने हा सिमेंट रस्ता आणि पटाव नागरिकांसाठी जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त होत असून, दररोज नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
अनेकदा नागरिकांनी, दुकानदारांनी संबंधित कंत्राटदारास सूचना दिल्या. अभियंत्याससुद्धा समजावून सांगितले. परंतु मुजोर अभियंत्याने नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली. यावरून दोन दिवसांपासून या परिसरातील काम ठप्प असल्याचे चित्र आहे.
काम बंद तसेच योग्यरीत्या करण्यात न आल्याने नागरिकांच्या रहदारीचा मार्ग बंद झाला असून, नागरिकांनी मुजोर अभियंत्यावर संताप व्यक्त केला आहे. विकास शिंदे असे या अभियंत्याचे नाव असून, नाली बांधकाम आणि त्यावरील पटावाचे नियोजन शिंदे याच्याकडे आहे.
गिरड मार्गाकडे जाणाऱ्या या महामार्गाला ओमनगर, जिभकाटे ले-आऊट, भांडारकर ले-आऊट, शिवनगर, आंबेडकर कॉलनी, सुयोगनगर, रेवतकर ले-आऊट आदी परिसर जोडलेला आहे. यामुळे महामार्गावरून या ले-आऊटमध्ये दुचाकी, चारचाकींची वर्दळ नेहमीच असते. शिवाय, रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी प्रतिष्ठानेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने करून ठेवलेले नाली बांधकाम आणि पटाव यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. नालीवरील पटावाचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. याबाबत विकास शिंदे यांना विचारणा केली असता, दुरुस्ती करून देण्याचे त्यांनी नागरिकांसमोर मान्य केले. यावेळी दिलीप सोनटक्के, दिलीप राऊत, सतीश चौधरी, शालिनी गवळी, तुषार ढोरे, शुभम इनकने, अरविंद झाडे, अशोक बावणे, डॉ. प्रशांत कडू, सुनील कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.