डझनभर तरुणांचा पोलिस ठाण्यातच राडा, महिला पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
By योगेश पांडे | Published: August 10, 2023 10:51 AM2023-08-10T10:51:12+5:302023-08-10T10:55:00+5:30
सक्करदरा पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार : खुर्च्यांची फेकाफेक, सामानाची नासधूस
योगेश पांडे
नागपूर : एरवी एखादे संकट आले किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्रास दिला तर सुरक्षेसाठी लोक पोलिस ठाण्याकडे धाव घेतात. मात्र, पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी तेथेच सुरक्षित नसतील तर काय म्हणावे. सक्करदरा पोलिस ठाण्यात दोन दिवसांअगोदर असाच प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डझनभर आरोपींनी ठाण्याच्या आत राडा घालत महिला पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच तेथील खुर्च्यांची फेकाफेक करीत सामानाची नासधूस केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांचा मोठा स्टाफ असताना त्यांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली.
६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात रात्रपाळीचे अधिकारी व कर्मचारी असताना चैतन्य जयदेवश शामकुंवर (वय ३२, सोमवारीपेठ), त्याचा भाऊ तक्षील (२७), सलमान इब्राहीम शेख (२७, सोमवारी क्वॉर्टर) व अमन संजय साहू (२७, सोमवारीपेठ) हे पोलिस ठाण्यात आले. ते काही तरुणांची तक्रार घेऊन आले होते. शुभम अशोक शेंडे (३०, सोमवारी क्वॉर्टर) हा सलमानच्या घरासमोर आला व जोरजोराने हॉर्न वाजवू लागला. त्याला टोकले असता त्याने मित्रांना बोलविले व चौघांनाही मारहाण केल्याची तक्रार होती.
पोलिस त्यांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच शुभम शेंडे हा त्याच्या मित्रांसह पोलिस ठाण्यात आला. त्याच्यासोबत निरंजन कच्छवाह (२६, सोमवारी क्वॉर्टर), पंकज खरकाटे (२८, वकीलपेठ) व आणखी सहा ते सात तरुण होते. दोन्ही गटांमध्ये पोलिस ठाण्यातच वादावादी सुरू झाली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपी ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. आपण कुठे उभे आहोत याचे भानच त्यांना राहिले नाही व स्टेशन डायरीजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पोलिस ठाण्यातच जोरजोरात ओरडत दोन्ही गटांतील तरुण राडा घालू लागले. पोलिसांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्कीदेखील केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक करून इतर सामानाची नासधूस केली. बऱ्याच प्रयत्नानंतर सर्व आरोपींना नियंत्रणात आणण्यात आले. सक्करदरा पोलिस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डीबी स्क्वॉड बोलावूनदेखील फायदा नाही
ज्यावेळी हा राडा झाला तेव्हा सक्करदरा पोलिस ठाण्यात डझनभर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आरोपींनी गोंधळ सुरू केल्यानंतर नाईट राऊंडवरील अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली व डीबी स्क्वॉडचे कर्मचारीदेखील ठाण्यात पोहोचले. मात्र, सर्वांसमोरच आरोपींनी खुर्च्यांची फेकाफेक केली. तसेच महिला कर्मचाऱ्यांनादेखील धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.