डीपीसीने गत वर्षीच केली शिफारस
By admin | Published: August 31, 2015 02:43 AM2015-08-31T02:43:19+5:302015-08-31T02:43:19+5:30
जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षीच शासनाला केली असल्याची बाब उघडकीस आली आहे,
दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा : झारीतील शुक्राचार्य कोण ?
नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षीच शासनाला केली असल्याची बाब उघडकीस आली आहे, असे असताना दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी कशी काय घोषित करण्यात आली. यातील झारीतील शुक्राचार्य कोण,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दीक्षाभूमीचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन त्याला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासंदर्भात होत असलेली मागणी लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महानगरपालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. ३० जून २०१४ रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दीक्षाभूमी व हजरत ताजुद्दीन बाबा दर्गा यावर चर्चा करण्यात आली. या दोन्ही स्थळांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले.दीक्षाभूमीला दरवर्षी १० लाख लोक भेट देतात. तेव्हा त्याचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन दीक्षाभूमीसह हजरत बाबा दर्गाला अ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे केली. जिल्हा नियोजन समितीने अ श्रेणी दर्जा देण्याची शिफारस केली असताना शासनाने ब श्रेणीचा दर्जा का दिला तसेच यातील झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
राज्य शासनाने शिर्डी व सिद्धीविनायक मंदिराला अ श्रेणीचा दर्जा बहाल केला आहे. त्याचे स्वागत आहे मात्र ज्या दीक्षाभूमीवर देशातीलच नव्हे तर जगातील लाखो लोक येतात. येथे येऊन नवीन ऊर्जा घेऊन जातात. त्या दीक्षाभूमीला ‘अ ’श्रेणीचा दर्जा का दिला गेला नाही. पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या दीक्षाभूीला अ श्रेणीचा दर्जा तातडीने मिळायलाच हवा. त्याचबरोबर मुंबईतील चैत्यभूमीला सुद्धा तसाच दर्जा दिला जावा. यासंदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.
खा. रामदास आठवले - अध्यक्ष-रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)
आता तातडीने कार्यवाही व्हावी
दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणई मी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. आ. विकास कुंभारे यांनी त्यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा लेखी आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्याचे आश्वासन दिले होते. त्या आधारावर जिल्हा नियोजन समितीने दीक्षाभूमीला अ श्रेणीचा दर्जा देण्याची शिफारस गेल्या वर्षी केली होती. ही शिफारस आधीच केली आहे. त्यामुळे पुन्हा डीपीसीमध्ये प्रस्ताव आणण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तातडीने मागवून दीक्षाभूमीला अ श्रेणीचा दर्जा देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
भूषण दडवे , शहर उपाध्यक्ष - भाजपा