डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विस्ताराकरिता १ हजार ४३ कोटीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:55+5:302021-09-03T04:07:55+5:30
नागपूर : कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राच्या विस्ताराकरिता १ हजार ४३ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव ...
नागपूर : कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राच्या विस्ताराकरिता १ हजार ४३ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, अशी नागपूरकरांची मागणी असून या नवीन घडामोडीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या सुधारित प्रस्तावाची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली, तसेच यादरम्यान सुधारित प्रस्तावासंदर्भात होणाऱ्या नवीन निर्णयाची माहिती पुढच्या तारखेला कळविण्याचा निर्देश सरकारला दिला.
यासंदर्भात कुणाल राऊत यांची अवमानना याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. इंदोरा येथील जमिनीवर (खसरा क्र. १०१/३, १०२/२, १०३/२) रुग्णालयाचा विस्तार करायचा आहे. ३१ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाने रुग्णालय विस्तार प्रस्तावावर चार महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. सरकारने त्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.