लंडनमध्ये साकारणार ‘डॉ.आंबेडकर अध्यासन’; सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 08:49 PM2017-12-20T20:49:27+5:302017-12-20T20:50:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये विशेष अध्यासन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’कडूनदेखील सकारात्मकता दर्शविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये विशेष अध्यासन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’कडूनदेखील सकारात्मकता दर्शविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९३ अन्वये अॅड.जयदेव गायकवाड यांनी यासंदर्भात सूचना मांडली होती.
लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१-२२ मध्ये उच्च शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केले होते ते घर शासनाने विकत घेतले आहे. मात्र पंतप्रधानांनी येथे भेट दिल्यानंतरदेखील या घराची अवस्था फारशी चांगली नाही. येथे स्मारकदेखील साकारण्यात आले नाही, हे मुद्दे अॅड.गायकवाड यांनी मांडले. यासंदर्भात उत्तर देताना स्मारकासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या नावाने अध्यासनदेखील सुरू होईल, असेदेखील त्यांनी सांगितले. ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्रवेश मिळाल्यास दोन विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचीदेखील शासनाची योजना आहे. संबंधित घराचे नूतनीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी पुरवणी मागणीद्वारे साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला असून यातील सव्वातीन कोटींचा निधी वितरीत करण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.