डाॅ. आंबेडकर चरित्र साधने समितीच्या पुनर्गठनाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:25+5:302021-03-31T04:09:25+5:30
नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्गठनाला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. समितीवर नेमण्यात आलेल्या ...
नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्गठनाला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. समितीवर नेमण्यात आलेल्या नवीन अशासकीय सदस्यांमध्ये नागपूरला झुकते माप देत सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मागील समितीच्या अशासकीय सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने समिती थंडबस्त्यात गेली हाेती आणि महापुरुषाच्या साहित्याचे संपादन व प्रकाशन रखडले हाेते. लाेकमतने हा विषय सातत्याने उचलून धरला हाेता. समितीच्या पुनर्गठनामुळे डाॅ. बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुनर्गठन करण्यात आलेल्या समितीवर नागपूरचे प्रा. रणजित मेश्राम, डाॅ. ताराचंद खांडेकर, पत्रकार केवल जीवनतारे, सदस्य सचिव म्हणून डाॅ. कृष्णा कांबळे, एन. जी. कांबळे आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हे अध्यक्ष तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शासकीय मुद्रणालयाचे संचालक, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तसेच अशासकीय सदस्यांमध्ये डाॅ. प्रज्ञा दया पवार, ज. वि. पवार, डाॅ. भालचंद्र मुणगेकर, शफाअत खान, याेगीराज बागुल, डाॅ. मधुकर कासारे, लहू कानडे, डाॅ. संभाजी बिरांजे, डाॅ. धनराज काेहचाडे, डाॅ. कमलाकर पायस, डाॅ. बबन जाेगदंड यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बांधणीत राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. आंबेडकर यांच्या कार्याचे याेगदान माेठे आहे. राज्याच्या पुराेगामित्वाची जडणघडण करण्यास प्रेरणादायी ठरलेल्या या महापुरुषांच्या साहित्याचा वारसा जतन करण्यासाठी चरित्र साधने प्रकाशन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. ही समिती महापुरुषांच्या चरित्र साधनांच्या संपादन व प्रकाशनाचे ३ वर्षे कार्य पाहते. या समित्यांनी प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांना देशविदेशात माेठी मागणी आहे. त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित हाेता. मात्र राज्य शासनाकडून ताे मंजूर न झाल्याने साहित्य प्रकाशनाचे कामही खाेळंबले हाेते. डाॅ. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित हाेण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.