...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 03:18 PM2022-05-16T15:18:04+5:302022-05-16T15:56:45+5:30

आज ही मूर्ती शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात स्थापन आहे.

Dr. Babasaheb ambedkar arranged Buddha statue for dhamma ceremony | ...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यवर्ती संग्रहालयातून आणली मूर्ती : तत्कालीन मुख्यमंत्री शुक्ला यांनी दिले होते आदेश

सुमेध वाघमारे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा धम्म दिला. ज्या बुद्ध मूर्तीची साक्षीने हा धम्म सोहळा पार पडला त्या बुद्धमूर्तीसाठी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी अथक प्रयत्न करून रातोरात बुद्धमूर्तीची सोय केली.

बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या तयारीसाठी ११ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माईसाहेबांसमवेत नागपुरात आगमन झाले. बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या तयारीची सर्व जबाबदारी बौद्ध जन सभेच्या नागपूर शाखेकडे होती. वामनराव गोडबोले हे या सभेचे प्रमुख होते. धम्म दीक्षा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्याम हॉटेलच्या रूम नंबर ११६ मध्ये बाबासाहेब थांबलेले होते. वामनराव गोडबोले सोहळ्या विषयी माहिती देत असताना त्यांना थांबवत बाबासाहेबांनी उद्या सोहळ्याच्या मंचावर तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवण्यास सांगितले. त्यावेळी रात्रीचे ९ वाजले होते. आता बुद्ध मूर्ती कोठून आणायची, असा पेच गोडबोले यांना पडला. कारण मूर्तीची अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांनी बाबासाहेबांना तसं सांगितले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'मला हे आधीच माहीत असते तर दिल्लीच्या घरून मूर्ती सोबत आणली असती. असे म्हणत बाबासाहेब विचार करायला लागले. नागपुरात बुद्धांची मूर्ती मिळेल, याची शक्यता कमीच होती.

- मध्यरात्री उघडले संग्रहालयाचे दार

मध्यरात्र होत असतानाच गोडबोले यांनाच एक मार्ग सापडला. नागपूरमध्ये सरकारी मध्यवर्ती संग्रहालय तथागत गौतम बुद्धांची एक धातूची मूर्ती असल्याचे त्यांना आठवले. परंतु इतक्या रात्री संग्रहालय उघडणार कसे, हा प्रश्न होता. त्यांनी ही अडचण बाबासाहेबांना सांगितली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी सीपी अँड बेरार राज्याची नागपूर ही राजधानी होती. रविशंकर शुक्ला हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. मुंबईहून १० ऑक्टोबर १९५६ रोजी येताना त्यांच्या विमानात रविशंकर शुक्लाही होते. बाबासाहेबांनी लागलीच मुख्यमंत्र्यांना श्याम हॉटेलच्या आपल्या खोलीतून फोन केला. त्यांना सर्व हकीकत सांगितली. मुख्यमंत्री शुक्ला यांनी मध्यवर्ती संग्रहालयाचे तत्कालीन क्युरेटर एस. एस. पटवर्धन यांना फोन करून बुद्धमूर्ती देण्याचा सूचना केल्या. बाबासाहेबांनी के. एन. खरे यांना पत्र देऊन ती मूर्ती आणायला पाठविले. मध्यरात्री १२ वाजता बुद्धमूर्ती आणि दोन सिंह मिळाले.

- तथागतांच्या मूर्तीवर सोनेरी झळाई

बुद्धमूर्ती सीताबर्डी येथील कार्यालयात आणण्यात आली. परंतु मूर्तीवर झळाई नव्हती. आता इतक्या रात्री पॉलिश करण्यासाठी ‘ब्रासो’ कुठून आणायचा, हा पेच निर्माण झाला होता. पण त्यावरही मार्ग निघाला. जवळच सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून ‘ब्रासो’ आणले. अखेर तथागतांच्या मूर्तीवर सोनेरी झळाई आली. सकाळ होण्यापूर्वीच ती मूर्ती धम्म दीक्षा सोहळ्याच्या मुख्य मंचावर विराजमान झाली. आज ही मूर्ती शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात स्थापन आहे.

Web Title: Dr. Babasaheb ambedkar arranged Buddha statue for dhamma ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.