डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर; ११३ कोटीचा प्रकल्प १३ कोटीसाठी अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 07:00 AM2020-11-01T07:00:00+5:302020-11-01T07:00:17+5:30
Nagpur News Dr. Babasaheb Ambedkar Convention Center नागपूरच्या वैभवात भर घालणारा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर होय. आघाडी शासनाच्या काळातील हा प्रकल्प आता कुठे पूर्णत्वास येऊ घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या वैभवात भर घालणारा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर होय. आघाडी शासनाच्या काळातील हा प्रकल्प आता कुठे पूर्णत्वास येऊ घातला आहे. ११३ कोटीच्या या प्रकल्पावर तब्बल १०० कोटी रुपये खर्च झाले असून अंतर्गत कामे शिल्लक आहेत. उर्वरित केवळ १३ कोटी रुपयाचा निधी शासनाने पुन्हा अडवल्याने जवळपास पूर्णत्वास आलेला प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत हत्ती गेला आणि शेपूट राहिले, अशी चर्चा आहे.
नागपूर हे झपाट्याने विस्तारत आहे. स्मार्ट सिटी सुद्धा होऊ घातली आहे. अशात शहरात एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर नसल्याने ते व्हावे, अशी नागरिकांची इच्छा होती. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरची कल्पना पुढे आली. उत्तर नागपुरातील नागरिकांनी यासाठी आग्रह धरला. तत्कालीन लोकप्रतिनींनी विशेष प्रयत्न केले.
कामठी रोडवर नासुप्रच्या ७५०० चौरस मीटर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत २००९ मध्ये हा प्रकल्प समाविष्ट करण्यात आला. त्यासाठी ११ सप्टेंबर, २०१४ रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आर्थिक तरतूदही करण्यात आली. १६ नोव्हेंबर, २०१३ रोजी शासकीय परिपत्रक काढून ११०.७४ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली. १४ मार्च, २०११ रोजी २२ कोटी रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले. उर्वरित ९१.७४ कोटींची रक्कमही नासुप्रकडे देण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ ऑक्टोबर, २०१३ रोजी भूमिपूजन सोहळाही पार पडला.
दरम्यान निधीबाबत अनेक संकटे आली. परंतु काम सुरु राहिले. मागील पाच वर्षाच झपाट्याने काम झाले. इमारत सध्या पूर्ण झाली आहे. अंतर्गत फिनीशिंग व फर्निचरची कामे शिल्लक आहेत. ११३ कोटी पैकी १०० कोटी खर्च झाले आहे. उर्वरित १३ कोटीचा निधी शासन स्तरावर अडकला असल्याने किरकोळ कामे अडकली आहेत.
असे आहे कन्व्हेंशन सेंटर
- संसद भवनाची प्रतिकृती असलेले हे कन्व्हेंशन सेंटर केवळ उत्तर नागपूरच नव्हे तर एकूणच नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल
- यात आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी असेल
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करणाऱ्या जगभरातील लोकांना येथे वाव असेल
- कलावंतांसाठी एक आर्ट गॅलरी
- रिसर्च सेंटर