राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:49 AM2020-01-17T10:49:02+5:302020-01-17T10:49:31+5:30
आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याची नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुद्धिस्ट सर्किटच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारण्यात येईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या कॉरिडोरमुळे संशोधक व अभ्यासकांसह पर्यटकांनाही याचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री म्हणून नितीन राऊ त गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलत होते. पालकमंत्री राऊत म्हणाले, आज भारतीय संविधानाबद्दल देशभरात चर्चा आहे. पर्यायाने भारतीय संविधानाचे शिल्पकार यांच्याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक स्थळे महाराष्ट्रात आहे. तेव्हा या महामानवाशी संबंधित स्थळांचा विकास करून त्याचा कॉरिडोर तयार केल्यास संशोधक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरेल. तसेच यातून पर्यटनाचाही विकास होईल.
आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याचीही आपली योजना आहे. ही योजना अतिशय जुनी असली तरी आता ती पूर्ण केली जाईल. यात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, पॅगोडा, विपश्यना केंद्र अशा सुविधा यात असतील. यामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. रोजगार वाढेल. यासाठी फुटाळा तलावाजवळील बायोडायव्हर्सिटीची जागा निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. झिरो माईलचे सौंदर्यीकरण व यशवंत स्टेडियमच्या जागेवर भव्य वास्तु तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राहुल पांडे यांनी संचालन केले. यावेळी संजय दुबे, राजा करवाडे, अनिल नगरारे, प्रभाकर दुपारे आदी उपस्थित होते.
२४ बाय ७ केवळ देखावा
पालकमंत्री राऊत यांनी यावेळी शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा हा केवळ देखावा असल्याचे सांगितले. शहरात २४ तास पाणी कुठेही मिळत नाही. पाण्यासाठी टँकर बोलवावे लागतात. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन कोच्चीवरून टनेलद्वारा पाणी आणण्यासाठी सरकार मध्य प्रदेश सरकारशी चर्चा करेल, असेही सांगितले.
नागपुरातील आयएएस कोचिंग सेंटर अपग्रेड होणार
नागपुरात आयएएस कोचिंग सेंटर आहे. हे सेंटर अतिशय चांगले आहे. परंतु यात एक वर्षाचाच कोर्स आहे. हे सेंटर अपग्रेड करण्यात येईल. येथील कोर्स दोन वर्षाचा करण्याचा विचार आहे. यासोबतच येथील वाचनालय व क्लासरुमसुद्धा अपग्रेड केले जातील. उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर राऊत यांनी सांगितले की, भूमिपुत्राना नोकरी मिळालीच पाहिजे परंतु आमचे युवक काही गोष्टींमध्ये मागे राहतात. अशा वेळी त्यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र स्थापित करण्याची योजना असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.
विकास योजनांचे श्रेय
पालकमंत्री राऊत यांनी यावेळी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांचे श्रेय घेतले. त्यांनी सांगितले की, लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएमसाठी मी प्रयत्न केले. शासकीय इंजिनियरिंग कॉलेज हे उत्तर नागपुरात होणार होते. परंतु फडणवीस ते आपल्या मतदार संघात घेऊन गेले. शहरातील उड्डाण पुलांच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. आयआरडीपीचे मॉडेल रोड त्यांच्याच आमदार निधीतून साकारण्यात आले. मेट्रो रेल्वेचा संकल्पनाही काँग्रेसचीच आहे. मेट्रो जर भूमिगत असती तर शहरातील सौंदर्य कायम असते.