बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 08:20 IST2024-12-21T08:19:38+5:302024-12-21T08:20:43+5:30
विधानसभेत बाबासाहेबांचे पोस्टर, 'जय भीम'चे नारे। दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप : कामकाज तहकूब

बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच, आम्हीच त्यांचे खरे अनुयायी हे ठसवण्याची जणू स्पर्धाच शुक्रवारी विधानसभेत पाहायला मिळाली.
विधानसभेत बाबासाहेबांचे फोटो लागले. सत्तापक्ष व विरोधक समोरासमोर आले. बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत, नारेबाजी झाली. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सभागृह बाबासाहेबांच्या संविधानानुसारच चालावे, असे सांगत दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या वादामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले. बाबासाहेबांच्या घोषणांमुळे अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच गाजला.
सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी डॉ. आंबेडकरांचे फोटो त्यांच्या बाकापुढे लावले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार बोलायला उभे झाले. त्यांनी मुंबईत काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्तापक्षाच्या सदस्यांनी नारेबाजी सुरू केली. बाबासाहेबांचे फोटो लावण्याची परवानगी आम्हालाही द्यावी, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी कुणालाही फोटो लावण्याची परवानगी दिली नाही, असे सांगितले. फोटो लावल्याने सदस्यांचे चेहरे दिसत नसल्याचे सांगत फोटो काढण्याची विनंती केली. यावर विरोधी पक्षासह सत्तापक्षाचे आमदार देखील आक्रमक झाले. नारेबाजी वाढू लागली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले.
कामकाज थांबले तरी नारेबाजी सुरूच
कामकाज स्थगित झाल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरूच होता. सत्तापक्षाच्या सदस्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणले आणि आपापल्या बाकांपुढे लावले. विरोधी पक्षांचे नेते 'जय भीम'चे नारे लावत राहिले. सत्ता पक्ष उत्तरात त्यांना ढोंगी असल्याचे नारे लावत होते. काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा विरोध केला. त्यांना निवडणुकीत हरविले असा आरोपही सत्तापक्षांकडून होत होता. त्यानंतर दोन्ही बाजूंचे सदस्य एकमेकांसमोर आले. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, विकास ठाकरे आक्रमक होते.