श्वास माेकळे, पाश माेकळे, भीमजन्माने आकाश माेकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 01:39 PM2022-04-15T13:39:56+5:302022-04-15T13:43:28+5:30

भीमजयंती म्हणजे नागपूरकरांचा विशेष साेहळा. ते उत्सवमय वातावरण गुरुवारी शहरात सर्वत्र दिसून आले.

dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm nagpur | श्वास माेकळे, पाश माेकळे, भीमजन्माने आकाश माेकळे

श्वास माेकळे, पाश माेकळे, भीमजन्माने आकाश माेकळे

googlenewsNext
ठळक मुद्देभीमजयंती जल्लाेषात : दीक्षाभूमी, संविधान चाैक फुललेवस्त्यांमध्ये जयभीमचा जयघाेष

नागपूर : काेराेनाने जसे दाेन वर्षे साऱ्यांना बंदिस्त केले हाेते, तसे धर्माच्या अवडंबराने हीन, दिन- दलित, बहुजनांना शेकडाे वर्षे गुलामीत जाेखडबंद ठेवले हाेते. या गुलामीचे पाश मोकळे करीत अशा सर्वांचे श्वास आणि आकाश माेकळे करण्याचे काम खऱ्या अर्थाने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणूनच ‘उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’, असे म्हणतात. त्या प्रज्ञासूर्याच्या जन्मदिनी नागपूरकरांमध्ये उत्साह संचारला हाेता.

भीमजयंती म्हणजे नागपूरकरांचा विशेष साेहळा. ते उत्सवमय वातावरण गुरुवारी शहरात सर्वत्र दिसून आले. घरांचे दार, वस्त्यांचे गेट अन रस्ते ताेरण, पताका, पंचशील ध्वज आणि निळ्या कमानींनी सजले. तसे जयंतीच्या आदल्या दिवशीपासूनच शहरात उत्साह संचारला हाेता. मुक्त श्वासाने गुरुवारी सकाळपासूनच अनुयायांची पावले दीक्षाभूमीकडे वळली. पांढरे शुभ्र वस्त्र, निळ्या पताका, पंचशील ध्वज घेऊन वस्त्यावस्त्यांमधून मिरवणुका निघाल्या. दिवसभर हजाराे अनुयायांनी प्रेरणाभूमीला नतमस्तक हाेत तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन केले. सकाळी परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीतर्फे समितीचे अध्यक्ष व धम्म सेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व भिक्खू संघाच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवर बुद्धवंदना घेण्यात आली. समता सैनिक दलाच्या शेकडाे सैनिकांनी परेड करीत महामानवाला मानवंदना दिली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमी उपासक, उपासिकांच्या उपस्थितीने फुलून गेली हाेती.

इकडे संविधान चाैकही अनुयायी व बहुजन विचारक आबालवृद्धांच्या गर्दीने ओसंडून वाहत हाेता. सकाळपासून शेकडाे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्था, संघटनांनी डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन केले. संघटनांचे कार्यकर्ते, वस्त्यांमधील रॅली संविधान चाैकात पाेहचल्या हाेत्या. बुद्धम शरणम गच्छामीचे स्वर आणि बाबासाहेबांचा जयघाेष आकाशात भिनला हाेता.

दुसरीकडे शहरातील समस्त वस्त्यांमध्ये जणू भीमजयंतीचा उत्साह संचारला हाेता. भीम पहाटने सकाळची सुरुवात झाली. वस्त्यांमध्ये सामूहिक भाेजन, भीमगीतांचे कार्यक्रम, भाेजनदान झाले. नागरिकांनी मिठाई वाटून एकमेकांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. निळ्या कमानी, ताेरण, पताकांनी शहरातील वस्त्या सजल्या हाेत्या.

साेशल मीडियावर भीमजयंतीच्या शुभेच्छा संदेशांनी ओसंडून वाहत हाेता. फेसबूक, व्हाॅट्सॲपवर वेगवेगळ्या छवीतील बाबासाहेबांचे छायाचित्र, त्यांचे विचार, तत्वज्ञान, संदेश पाठवून महामानवाच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. साेशल प्लॅटफार्मवर आंबेडकरी विचारांवर मार्गदर्शन, प्रबाेधनपर कार्यक्रमांचे आयाेजनही करण्यात आले. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, संविधान, कायदे निर्मिती, ऊर्जा, वनसंवर्धन अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांच्या बहुआयामी कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे संदेश सर्वत्र फिरत हाेते. एकूणच बाबासाहेबांच्या जयंतीचा ऐतिहासिक साेहळा सर्वच स्तरावर साजरा करण्यात आला.

Web Title: dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.