भीमराया...उदंड केलीस अमुच्यावरती माया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:11 AM2019-04-15T10:11:50+5:302019-04-15T10:13:37+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब म्हणजे समानतेचे, न्यायाचे व ज्ञानाचे प्रतीक. अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरूद्ध त्यांनी बांधलेल्या वज्रमुठीमुळे या देशातील तमाम दीन, दलित समाजाला समानतेचा अधिकार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आजही अनुयायांच्या मनामनात कोरले आहेत. या महामानवाच्या जयंतीनिमित्त तमाम शोषित, पीडित, वंचित, दीनदु:खी, बहुजनांच्या मनात ‘बलिदानाचे कफन बांधून झिजला तू भीमराया, माय पित्याहून उदंड केलीस अमुच्यावरती माया...’ ही भावना दाटून आली होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रत्येक भागात, वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. कुणी केक कापून तर कुणी बुद्ध भीम गीते आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वस्त्यांवस्त्यांमधील बौद्ध विहारांनी रॅली काढून महामानवास मानवंदना दिली. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक आणि शांतिवन चिचोली येथे मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनीसुद्धा महामानवास अभिवादन केले.
दीक्षाभूमीवर महामानवाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. येथे दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळीही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेसही आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांतिवन चिचोली येथेही लोकांनी एकत्र येऊन अभिवादन केले.
संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली.