डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! राज्यघटनेचा मसुदा लिहिलेल्या टाईपरायटरसह अन्य वस्तूंवर होणार रासायनिक प्रक्रिया; १०० वर्षे टिकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 07:00 AM2022-04-14T07:00:00+5:302022-04-14T07:00:06+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यांनी राज्यघटना ज्यावर टाईप केली त्या टाईपरायटरवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपयोगात आणलेल्या वस्तू येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्या चिरकाल टिकाव्यात म्हणून त्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. जवळपास ८५ टक्के वस्तूंवर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात बाबासाहेबांनी लिहिलेला ऐतिहासिक ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा पहिल्यांदा ज्या टाईपरायटवर टाईप केला त्याचा समावेश आहे. शांतिवन चिचोली येथील संग्रहालयातील या ऐतिहासिक वस्तूंवर अजबबंगला या केंद्रीय वस्तूसंग्रहालयात रासायनिक प्रक्रिया केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी प्रशिक्षित धम्म सेनानी तयार व्हावेत, असे विचार व्यक्त केले होते. धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेला प्रशिक्षित उपासक समाजात तयार व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्म सेनानी वामनराव गोडबोले कामाला लागले. यासाठी त्यांना काटोल रोडवरील चिचोली या गावातील एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी महाविद्यालय उभारण्याचा त्यांचा मानस होता.
त्यांच्याकडे महामानवाच्या अनेक वस्तूही होत्या. डॉ. आंबेडकरांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनीही त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या अनेक वस्तू भेट दिल्या. माईसाहेबांनीसुद्धा (बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी) त्यांना काही वस्तू भेट दिल्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले कपडे, कोट, टाय, टोपी, जॅकेट, खुर्ची यासह बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय राज्यघटनेच्या मसुदा ज्या टाईपरायटरवर सर्वप्रथम टाईप करण्यात आला होता, तो टाईपरायटर. ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळ्यासाठी वापरण्यात आलेली बुद्धमूर्ती आदींसह महामानवाच्या जीवनाशी संबंधित व त्यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे.
आता या वस्तू कुठे ठेवायच्या, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. तेव्हा त्यांनी एक संग्रहालय उभारले. निधीअभावी त्यांना प्रशिक्षण इमारतीचे कामही पूर्ण करता आले नाही. त्यांच्यानंतर संजय पाटील हे शांतिवन चिचोलीची देखभाल करू लागले. येथील संग्रहालय तसे लहान. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने ते उभारण्यात न आल्याने महामानवाच्या वस्तू नष्ट होण्यास सुरुवात झाली. कपड्यांना वाळवी लागायला लागली. आता या वस्तू वाचविणे हेच एक मोठे आव्हान होते. यासाठी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महामानवांच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तू अनेक वर्षे टिकून राहतील, या कामाला सुरुवात झाली. ती जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे.
या ऐतिहासिक वस्तू योग्य ठिकाणी राहाव्यात म्हणून संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाने विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत ४० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला. यासोबतच पर्यटन विकासांतर्गत १७ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. या निधीतून आता महामानवाच्या ऐतिहासिक वस्तूंंसाठी भव्य संग्रहालय, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मेडिटेशन सेंटर, उपासक गृह, बौद्ध धम्माचे शिक्षण देणारे प्रचारक विद्यालयाची इमारत, वसतिगृह आदी इमारती बांधून झाल्या आहेत. शेवटच्या फिनिशिंगचे काम शिल्लक आहे.
शांतिवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात महामानवाशी संबंधित ५०० वर वस्तू आहेत. त्यातील ४०० वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पार पडली आहे. परंतु संग्रहालयाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. वस्तू संग्रहालय तातडीने सुरू झाले नाही तर रासायनिक प्रक्रिया झालेल्या वस्तू कुठे ठेवणार. त्याची योग्य देखभाल न झाल्यास त्या पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- संजय पाटील,
कार्यवाह, शांतिवन चिचोली