डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक : प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे
By आनंद डेकाटे | Published: March 27, 2023 05:33 PM2023-03-27T17:33:33+5:302023-03-27T17:34:59+5:30
'जनता' खंड - ग्रंथभेट कार्यक्रम
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या जनता पाक्षिकाने गुलामगिरी विरुद्ध बंड करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचारधन आज समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सामूहिकपणे पार पाडली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जनता' वृत्तपत्र खंडांचा ग्रंथभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनता खंड क्र. - १ व जनता खंड क्र. - २ हे दोन खंड ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे सद्यस्थितीत प्रकाशित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकला. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले तर आभार प्रा. मंगेश जुनघरे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. रमेश शंभरकर, डॉ. धनराज डहाट, प्रा. प्रीती वानखेडे तसेच अन्य सहकारी प्राध्यापक व विभागातील शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
- ७ वर्षात केवळ दोनच खंड प्रकाशित
डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी यावेळी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्र २४ खंडात प्रकाशित करुन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ वर्षी सामंजस्य करार झाला होता.व त्यानुसार जनता पाक्षिकाच्या प्रती विद्यापीठादवारे शासनास देण्यात आल्या होत्या. करारात २४ खंड ५ वर्षात प्रकाशित करण्याची अट होती.पंरतु ७ वर्ष लोटले तरी शासनाने फक्त २ खंड प्रकाशित केले आहेत. शासनाने करारनामा नुसार सर्व खंड प्रकाशित करावे, असे आवाहन त्यांनी केले.