डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या बचावासाठी नागरिकांचा सहभाग; आंदोलनाचा दुसरा दिवस
By सुमेध वाघमार | Published: November 27, 2023 07:28 PM2023-11-27T19:28:06+5:302023-11-27T19:28:14+5:30
मध्य भारतामध्ये काही अंशी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम देणारी एकमेव संस्था म्हणजे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय आहे.
नागपूर : इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र पळविण्याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीने जनआंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाला नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मध्य भारतामध्ये काही अंशी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम देणारी एकमेव संस्था म्हणजे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय आहे.
परंतु संपूर्ण विदभार्चा व मध्य भारताचा विचार केल्यास अतिविशेषोपचार सोयी वाढविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ संस्था निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनासाठी अतिविशेषोपचार विभाग व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ४ मार्च २०१४मध्ये घेतला होता. परंतु त्यानंतरही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादीत आहे. आता हे रुग्णालयच इतरत्र पळविण्यात येत असल्याने रविवारपासून जनआंदोलन उभारण्यात आले. सोमवारी आ. नितीन राऊत, जेष्ठ विचारवंत उत्तम कांबळे, ओबीसी नेते व माजी आमदार अशोक धवड आणि बसपाचे उत्तम शेवळे यांनी भेट देवून कृती समितीच्या आंदोलनाला समर्थन दिले. सकाळपासून मूलचंद मेहर, शेख शहाबुद्दीन, राजेश कोहाड, दीपा गांवडे आणि विणा दरवाडे यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. संजय दुबे, छाया खोब्रागडे, वेदप्रकाश आर्य, बंडोपंत टेम्भूर्णे, दिनेश अंडरसहारे, संघपाल उपरे आणि उमेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.