कन्व्हेंशन सेंटरमधील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला मंजुरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:58+5:302021-03-21T04:07:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर नागपुरातील इंदोरा भागात निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील इंदोरा भागात निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२ मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारच्या कला संचालनालयाने मंजुरी दिली आहे. हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे एक आकर्षण ठरणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर कामठी मार्गावरील इंदोरा भागात उभारले जात आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एनएमआरडीए) हा पुतळा उभारला जात आहे. या पुतळ्याचे क्ले मॉडेल नागपूर येथील मेसर्स प्रज्ञा भारतीय शिल्पकला दर्शन या संस्थेने तयार केले आहे. याला राज्य सरकारच्या कला संचालनालयाची मंजुरी आवश्यक होती. कला संचालनालयाच्या तज्ज्ञांनी या क्ले मॉडेलची पाहणी केली. हा पुतळा कलात्मकदृष्ट्या योग्य होईल काय? यावरही या तज्ज्ञांनी अभ्यास केला. यानंतर पुतळा उभारण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी ६ फूट क्ले मॉडेल व आता १२ फूट उंचीच्या क्ले मॉडेलची पाहणी केल्यानंतर कला संचालनालयाने या पुतळ्याच्या उभारणीला संमती दिली आहे. यामुळे आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या आराखड्यासाठी मुख्य वास्तुशास्त्रज्ञांची लवकरच मंजुरी घेतली जाईल. यासंदर्भात राज्य सरकारच्या कला संचालनालयाने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पत्राद्वारे कळविले आहे.