डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड’ पुस्तकाचे प्रकाशन करणार डॉ.थरूर; ३० मे रोजी नवी दिल्लीत प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 08:00 AM2023-05-28T08:00:00+5:302023-05-28T08:00:06+5:30
Nagpur News लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांचे नवीन पुस्तक ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’चे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते ३० मे रोजी होणार आहे.
नागपूर : लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांचे नवीन पुस्तक ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’चे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते ३० मे रोजी होणार आहे.
नवी दिल्ली येथील रफी मार्गावरील ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’च्या स्पीकर हॉलमध्ये दुपारी ४.३० वाजता याबाबतचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हे पुस्तक डॉ. दर्डा यांच्या साप्ताहिक लेखांचे संकलन असून, त्यांनी हे लेख २०११ ते २०१६ दरम्यान ‘लोकमत’ व देशातील प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक दैनिक वृत्तपत्रांत प्रकाशित केले होते.
पुस्तक प्रकाशन समारंभाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे सल्लागार व लेखक डॉ. संजय बारू प्रामुख्याने उपस्थित राहातील. ‘रिंगसाइड’मध्ये विज्ञान, पर्यावरण, अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक विकास, क्रीडा, कला, संस्कृती, विदेशी धोरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर केलेले शोधपूर्ण लेखन आहे. यात प्रसिद्ध व्यक्तींवर लिहिलेल्या लेखांचाही समावेश आहे, ज्यांनी देश व जगात सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
राजदीप सरदेसाई करणार चर्चा
या समारंभात प्रसिद्ध ॲँकर, इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई हे डॉ. विजय दर्डा यांच्यासोबत पुस्तकावर चर्चा करणार आहेत. या चर्चेतून प्रकाशन समारंभात उपस्थितांना पुस्तकाची रचना व लेखकाचे अनुभव जाणून घेता येतील.